दैनिक स्थैर्य । दि.१३ एप्रिल २०२२ । फलटण । शिखर शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाला परंपरागत पध्दतीने जलाभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून अनेक मानाच्या कावडी बुधवार सायंकाळी मुंगी घाटाच्या पायथ्याशी कोथळे गावात एकत्र येणार असून त्यापैकी पुणे व सातारा जिल्ह्यातील कावडींचे मंगळवारी सकाळी फलटण शहरात भक्तीमय वातावरणात, हर हर महादेवाच्या जयघोषात स्वागत करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २ वर्षांपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद होती त्याचबरोबर राज्यातील विविध ठिकाणच्या यात्रा जत्रा धार्मिक महोत्सव बंद असल्याने राज्याच्या विविध भागातून शिखर शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाला जलाभिषेक घालण्यासाठी येणाऱ्या विविध गावातील मानाच्या कावडी ही आल्या नाहीत.
यावर्षी कोरोना नियंत्रणात असल्याने विविध देवदेवतांची मंदिरे खुली झाली असून यात्रा जत्रा धार्मिक महोत्सव सुरु झाले असल्याने परंपरागत पद्धतीने कावडी दाखल झाल्या आहेत. तहसिलदार समीर यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व भाविकांनी कावडीचे व त्यासोबत असणार्या मानकर्यांचे स्वागत करुन दर्शन घेतले. कावडी सोबत असणारी परंपरागत डफडी, शिंग, तुतार्या आणि हर हर महादेवाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला होता.
सासवड येथील भुतोजीबुवा तेली यांच्या मानाच्या कावडीसोबत असलेले मानकरी तसेच एखतपूर, खळद, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी वगैरे पंचक्रोशीतील मानाच्या कावडी व मानकर्यांचे भक्तिपूर्ण वातावरणात अनेकांनी स्वागत केले. त्यानंतर या सर्व कावडी आपापल्या नियोजनाप्रमाणे परंपरागत मार्गाने मुंगी घाटाकडे मार्गस्थ झाल्या. मुंगी घाटातून या सर्व कावडी उद्या बुधवार सायंकाळपर्यंत शिंगणापूर डोंगर पठारावर पोहोचतील आणि तेथून मानानुक्रमे शंभू महादेवाला जलाभिषेक करुन परततील.
गुणवरे ता. फलटण येथील आढाव कुटुंबाच्या कावडीला वाटाड्याचा मान असून सर्वांत पुढे असलेल्या या कावडीमागून सर्व कावडी जातात तर तेल्या भुत्याच्या कावडीचा मान शेवटी असून या कावडीतील गंगाजलाने शंभू महादेवाला रात्री 12 वाजता जलाभिषेक केल्यानंतर यात्रेची सांगता होईल. विशिष्ट प्रकारची वाद्ये आणि हर हर महादेवाचा जयघोषच कावडी मुंगी घाटातून नेण्याची प्रेरणा व शक्ती असल्याने त्याच्या निनादात आणि शंभू महादेवाच्या जयघोषात कावडी वर नेण्यात येतात त्यावेळी प्रचंड उन्हाचा तडाखा आणि मुंगी घाटाची उभी चढण या कावडी त्यांचे मानकरी आणि भक्त सहजपणाने चढून जाताना पाहण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने घाटाच्या पायथ्याशी आणि पठारावर उपस्थित असतात.