दैनिक स्थैर्य । दि. 08 डिसेंबर 2021 । फलटण । गुणवरे (ता. फलटण) येथील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयातील इयत्ता 1 ली ते 4 थी चे वर्ग शासन आदेशा प्रमाणे 1 डिसेंबर पासून प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेतील सर्व प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांचे त्यांना शालोपयोगी साहित्य देऊन व त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते.
याप्रसंगी सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार, व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, संचालिका सौ. प्रियांका पवार, मुख्याध्यापक सुनील आहिरे, पर्यवेक्षक किरण भोसले तसेच समन्वयीका सौ. सुप्रिया सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून स्वतः सुरक्षित राहून इतरांना कसे सुरक्षित ठेवाल यासंबंधी मार्गदर्शन केले व शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, पहिली ते सहावी पर्यंतचे विद्यार्थी व पालक कोरोना चे नियम पाळून शाळेत उपस्थित होते.
तत्पूर्वी पुर्वतयारी म्हणून शालेय परिसर व सर्व वर्गखोल्यांचा निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सीजन तपासणी करण्यासाठी थर्मल गन व ऑक्सीमिटरही उपलब्ध करून देण्यात आले. कोरोनामुळे मार्च 2020 पासून बंद असलेल्या शाळा आता सुरू झाल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग अजूनही पूर्णपणे कमी न झाल्यामुळे सर्व नियम व अटी पाळून शाळेत अध्ययन अध्यापनाचे काम चालू आहे. शाळेत सध्या एल.के.जी. च्या वर्गांचे ऑनलाइन पद्धतीने व यु.के.जी. व पहिली पासून पुढील वर्गांचे ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे.