विठू नामाच्या जयघोषात माऊलींच्या पादुकांचे फलटणमध्ये स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । फलटण । श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादूकांना पंढरपूरकडे घेऊन जाणार्‍या विशेष शिवशाही एस.टी. बसवर विठू नामाचा गजर आणि राम कृष्ण हरीच्या जयघोषात पान, फुलांची उधळण करत पालखी सोहळ्याचे फलटणकरांनी मोठ्या भक्तीभावात दर्शन घेतले तर फलटण तालुक्याच्या सीमेवर प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप, गटविकास अधिकारी डॉ.सौ.अमिता गावडे यांनी तालुक्याच्या सीमेवर पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आषाढी एकादशीनिमित्त निघणारा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आल्याने आषाढी एकादशीच्या एकदिवस आधी श्री ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा काल दि.19 रोजी आळंदीहून 40 मानकर्‍यांसह पंढरपूरकडे शिवशाही एस.टी. बसमधून मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्याचे फलटण तालुक्यात आगमन झाल्यानंतर सकाळच्या न्याहरीसाठी सोहळा सुरवडी येथील रॉयल पॅलेस मंगल कार्यालयात विसावला. याठिकाणी प्रशासनाच्यावतीने विशेष व्यवस्था ठेवण्यात आली होती. तद्नंतर सोहळ्याचे फलटण मार्गे पंढरपूरकडे प्रयाण झाले. यावेळी शहरातील जिंती नाका, नाना पाटील चौक या प्रमुख ठिकाणी भाविकांनी माऊलींच्या पादूका घेऊन जाणार्‍या शिवशाही बसवर पान, फुलांची उधळण करत मनोभावे दर्शन घेतले.

दरम्यान, पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर फलटणचे उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या नेतृत्वाखाली लोणंद, फलटण शहर व तालुका पोलीस ठाण्याचे सहकारी पोलीस अधिकारी/कर्मचार्‍यांनी चोख पोलीस बंदोबस्ताद्वारे कोठेही गर्दीमुळे अडथळा येणार नाही यासह कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


Back to top button
Don`t copy text!