दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२१ | सातारा | ‘प्रियांका मोहिते या गिर्यारोहकाने जगातील उत्तुंग शिखरं सर करण्याची कामगिरी केली. या कामगिरीचे कौतुुक करत तिला राष्ट्रपतींच्या हस्ते तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रियांकाची ही कामगिरी तरुणांना प्रेरणादायी असून, तिच्या पुरस्काराने जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे,’ असे गौरवोद्गार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये वर्ष २०२१ च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे शनिवारी वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिला तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रियांकाचे रविवारी सायंकाळी साताऱ्यातील पोवई नाक्यावर आगमन होताच ढोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर प्रियांका मोहिते हिचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ‘राजधानी सातारा’ या सेल्फी पाॅईंटरवर सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना प्रियांका म्हणाली, ‘आज हा माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. मी स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यापासून गिर्यारोहणाला सुरुवात केली. गेल्या अकरा वर्षांत मी अनेक शिखरे सर केली. हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसूून तो माझ्या कुटुंबाचा, जिल्ह्याचा किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. या पुरस्काराने गिर्यारोहण क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा उमटला याचा सार्थ अभिमान वाटतो.
यावेळी सातारा पालिकेचे पक्षप्रतोद अमोल मोहिते, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शरद काटकर, दीपक प्रभावळकर, सिद्धार्थ लाटकर यांच्यासह सातारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.