दैनिक स्थैर्य । 30 नोव्हेंबर 2024 । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी हे उद्यानदूत म्हणून शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कुरवली बु. येथे दाखल झाले आहेत.
कुरवली बु. येथील ग्रामपंचायत कार्यालयाला उद्यानदूतांनी भेट दिली. त्यावेळी सरपंच सौ. राणी सूळ, कृषीसहाय्यक वैभव निंबाळकर, ग्रामसेवक अलका जाधव व समस्त ग्रामस्त मंडळ यांनी उद्यानदूतांचे स्वागत केले.
दहा आठवडे चालणार्या या कार्यक्रमामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची विविध प्रात्यक्षिके शेतकर्यांना दाखवली जाणार आहेत. उद्यानविद्या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रात्यक्षिकांवर आधारित उपक्रम राबविला जातो. विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये वास्तव्य करून ग्रामीण भागातील शेतकर्यांना येणार्या अडचणी, त्यांचे जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, संबंधित गावातील पीक पद्धती अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती आधारित उद्योग व्यवसाय व इतर हवामानाविषयी जास्तीतजास्त माहिती विविध प्रकल्पाद्वारे कशी संपादित करता येईल, याबाबत उद्यानदूत आदित्य तिवाटणे, सचिन सणस, संकेत टेळे, विघ्नेश भुजबळ, सौरभ साबळे, कुणाल शिंदे व समीर राऊत हे शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी.चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्हीं. लेंभे व प्रा.ए.डी. पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.