
स्थैर्य, सातारा, दि. ११: कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या आदेशानुसार वीकेंड लॉकडाऊनमुळे खंडाळा तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता मुख्य तालुक्याचे ठिकाण असलेल्या खंडाळा तसेच मुख्य बाजारपेठ असलेल्या शिरवळ व परिसरातील सर्व बाजारपेठ, दुकाने, हॉटेल, नागरिकांची रहदारी पूर्णपणे बंद होती. बाजारपेठ बंद असल्यामुळे दररोजचा लाखो रुपयांचा उलाढाल थांबली.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये सध्या कोरोना रोगाच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजविला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आरोग्य यंत्रणेसह आपत्कालीन यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला आहे. दरम्यान, कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा आदेशानुसार शनिवार व रविवार या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण आस्थापना बंद करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी खंडाळा व शिरवळ पोलीसांनी युद्धपातळीवर राबवल्याने आज दिवसभर पोलिसांच्या सायरन व्यतिरिक्त व अत्यावश्यक सेवेमधील दवाखाने, मेडिकल, दुग्ध व्यवसाय वगळता सर्व आस्थापना नागरिकांनी व व्यापार्यांनी बंद हेवल्याने खंडाळा व शिरवळ याठिकाणी चौकाचौकांमध्ये शुकशुकाट जाणवत होता.
यावेळी खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे तर शिरवळ याठिकाणी पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.