स्थैर्य, फलटण, दि. १० : वीकेंड लॉकडाऊनचे नियम अधिक कठोर असून काल सायंकाळी सहा वाजल्यापासूनच लॉकडाऊन सुरू झालेला आहे. फलटण तालुक्यामध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा प्रत्यक्ष फिल्डवर उतरली आहे. फलटण शहर पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी फलटण शहरामध्ये स्वतः फिल्डवर उतरून पेट्रोलिंग करीत आहेत. त्या सोबतच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करत आहेत.
फलटण शहरात करोनाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. दररोजचा रुग्णांचा आकडा वाढता असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळेच करोनाची साखळी तोडण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असून वीकेंड लॉकडाऊनमध्ये जवळपास सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. या दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. नागरिकांना वैद्यकीय आणि अतितातडीच्या कारणास्तव बाहेर पडता येईल मात्र पोलिसांकडून याबाबत खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट आहे. याबाबत सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश जारी केलेले आहेत.