दैनिक स्थैर्य । दि.०९ फेब्रुवारी २०२१ । फलटण । अलिकडील सततच्या बदलत्या हवामानामुळे ऊसातील हुमणीचा प्रादुर्भाव दरवर्षी जुन ते सप्टेंबर महिन्यामध्ये सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. हुमणीची अळी सुमारे 6 ते 8 महिने जमिनीत राहून वनस्पतींच्या मुळांवर उपजिवीका करतात व वनस्पतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते; त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी हुमणीचा वाढता प्रादुर्भाव ही एक चिंतेची बाब बनत चालली आहे.रासायनिक किटकनाशकांस ही अळी विशेष दाद देत नसल्याने असे नियंत्रण खार्चिक बनते. मात्र योग्य वेळी जैविक कीड नियंत्रणाचा अवलंब केल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल.
महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे येथील कृषि किटकशास्त्र विभागात हुमणी अळीच्या प्रभावी जैविक नियंत्रणासाठी कार्यानुभवातून शिक्षण या कार्यक्रमाअंतर्गत डॉ.एन.डी.तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली 8 व्या सत्रातील विद्यार्थी फुले मेटारायझियम चे तंत्रशुद्ध पद्धतीने उत्पादन करत आहेत.
राज्यामध्ये खरिपातील भात, ऊस, ज्वारी इ. पीके, तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो. तीव्र प्रादुर्भाव असलेल्या भागांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा यांचा समावेश होतो.
’मेटारायझियम निसोप्लीई’ ही कीटकभक्षी बुरशी त्याच्या संपर्कात येणार्या कीटकांना संक्रमित करते. हुमणी अळीच्या प्रभावी जैविक नियंत्रणासाठी फुले मेटारायझियम हे बुरशीजन्य कीटकनाशक 25 किलो / हेक्टरी या प्रमाणात कुजलेल्या शेणखतातून जमिनीत मिसळून बुंध्यापाशी द्यावे किंवा 10 ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून मुळाच्या सभोवती आळवणीद्वारे द्यावे. पंधरवड्यातून एकदा या प्रमाणे महिन्यातून दोनदा वापर करावा.
द्राक्ष, डाळींब, पेरू, सिताफळ, आंबा, चिकू, भाजीपाला, शोभेची झाडे, इत्यादींवरील रस शोषणारे किडे, उदा. पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, मावा, फुलकिडे, तुडतुडे, खवले कीड तसेच पाने खाणार्या अळ्या, फळे व फुले पोखरणारी अळी यांच्या नियंत्रणासाठी देखील फुले मेटारायझियम प्रभावी ठरते. त्याकरिता 1000 ग्रॅम फुले मेटारायझियम / 200 लि. पाण्यात + 1 लि. दुध मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी.
ना नफा ना तोटा या तत्त्वावर 200 रू / किलो या रास्त दराने फुले मेटारायझियम कृषि महाविद्यालय , पुणे येथे शेतकर्यांना सहज उपलब्ध आहे.
डॉ.एन.डी.तांबोळी, कृषि किटकशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, पुणे.
संपर्क – 7588680786.