स्थैर्य, फलटण, दि. ४ : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाविषयी आवड निर्माण करण्यासाठी, विज्ञान तंत्रज्ञान याविषयी जिज्ञासा निर्माण होण्याच्या उद्देशाने गुरुवार दि. ४ जून रोजी नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या ‘रामण इफेक्ट व प्राद्योगिक उपयुक्तता’ या विषयावरील ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा या क्षेत्रातील रस अधिक वाढविण्यासाठी नोबेल पारितोषिक प्राप्त भारतीय वंशाचे थोर शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी केलेले शोधकार्य संपूर्ण जगातील शास्त्रज्ञासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन वेबिनार मध्ये सहभागी होऊन ज्ञानार्जन करावे असे आवाहन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
काळाची गरज ओळखून औद्योगिक क्षेत्रात कुशल अभियंते घडविण्यासाठी अशा प्रकारचे अनेक दर्जेदार उपक्रम महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीचे प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांनी दिली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉक डाऊन कालावधीत गुगल मीटच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्याख्यानाचा लाभ घेता यावा यासाठी उपाययोजना करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. अजय व्ही. देशमुख हे विद्यार्थ्यांना गुगल मीटच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. सी. व्ही. रमण हे भारतीय भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रमण असे होते, सन १९३० मध्ये त्यांना भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिकाने, त्यानंतर सन १९५४ मध्ये भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सन १९१७ ते १९३३ या कालावधीत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. सन १९४७ मध्ये त्यांनी रामण संशोधन संस्थेचे संचालक पद स्वीकारले. रामण परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) यासाठी ते ओळखले जाऊ लागले. चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या सन्मानार्थ भारतात प्रतिवर्षी दि. २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.