स्थैर्य, फलटण, दि. १०: सध्या कोरोनाने संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता फलटण मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याची बोलले जात आहे. अश्यामध्ये फलटण तालुक्यातील ग्रामीण भागागील सर्वसामान्य नागरिकांना लसीकरण करणे सुरू झालेले आहे. फलटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे. तिथे लसीकरण व औषधांचा साठा करण्यासाठी फ्रिजची आवश्यकता होती. हे श्रीमंत संजीवराजे यांना कळताच त्यांनी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये १६५ लिटर क्षमतेचे फ्रिज उपलब्ध करून दिलेले आहेत. तालुक्यावर कोणतेही संकट आले तरी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे कायमच मदतीसाठी धावून येतात याचा प्रत्यय नेहमीच तालुक्याला आलेला आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट यांनी व्यक्त केले.
फलटण येथील पंचायत समितीच्या आवारात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील २१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी हायर कंपनीचे १६५ लिटर क्षमतेचे फ्रिज प्रदान करण्यात आले. त्या वेळी सातारा जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट बोलत होते. या वेळी फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, तरडगावचे जेष्ठ नेते वसंतकाका गायकवाड, गोविंद मिल्कचे अमोल चावरे, निरंजन व्होरा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार म्हणाल्या की, सध्या कोरोना म्हणजेच कोव्हिडं १९ चे लसीकरण हे फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये सुरू झालेले आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. परंतु कोरोना लसीकरणचा साठा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये करण्यासाठी फ्रिजची आवश्यकता भासत होती, याची श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना कल्पना देताच त्यांनी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला त्वरित उपलब्ध करून दिलेले आहेत.
फलटण तालुक्यातील जावली, पवारवाडी, आदर्की बु.।।, सासवड, तरडफ, सोनवाडी खु.।।, वाठार, फरांदवाडी, विडणी, मठाचीवडी, अलगुलेवाडी, सोमंथळी, खुंटे, होळ, चौधरवाडी, जिंती, निंभोरे, फडतरवाडी, पाडेगाव, तांबवे, सालपे, हिंगणगाव या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या वतीने हायर कंपनीचे १६५ लिटरचे फ्रिज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.