संत नामदेव रथ आणि सायकल यात्रेचे परंपरेनुसार स्वागत करू : राज्यपाल गुलाबचंद कटारिया

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑगस्ट २०२४ | चंदीगड (पंजाब) |
संत नामदेवजींनी भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करून उत्तर आणि दक्षिण भारताला जोडण्याचे काम केले आहे. त्यांच्या रथ व सायकल यात्रेचे राजभवन चंदीगडमध्ये परंपरेनुसार स्वागत करू, असे पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी निमंत्रण दिल्यानंतर सांगितले.

महाराष्ट्र ही संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत तुकाराम आदी संतांची भूमी आहे. या संतांनी भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला. संत नामदेवांनी महाराष्ट्राबाहेर मुघल साम्राज्यात पंजाबपर्यंत भक्ती प्रेमाच्या जोरावर प्रचार केला आहे. पंजाब प्रांतात राहून १८ वर्षे त्यांनी भागवत धर्माचे कार्य केले आहे.

संत नामदेवजींच्या पश्चात ६७२ वर्षे महाराष्ट्राबाहेर भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे हे कार्य पुढे नेण्यासाठी भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य आणि देशभरातील सर्व नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी २५०० किमीची संत नामदेव महाराज चरण पादुका रथ व सायकल यात्रा काढण्यात येते. ही सायकल यात्रा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमधून जाईल.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरापासून या यात्रेचे प्रस्थान होईल व सांगता राजभवन, चंदीगड येथे होणार आहे. २ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता राजभवन, चंदीगड येथे यात्रेचे आगमन होईल. ४ डिसेंबर रोजी यात्रा श्री क्षेत्र घुमान येथे पोहोचेल. या प्रवासाची सांगता ५ डिसेंबर रोजी होणार आहे.

या भेटीसाठी व राज्यपालांना निमंत्रण देण्यासाठी भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, सचिव विलास काटे, पंजाब राज्य प्रमुख सरबजितसिंग बावा, बाबा नामदेव दरबार समितीचे सरचिटणीस सुखजिंदरसिंग बावा, भूपिंदरसिंग बमराह, डॉ. पवनप्रीत सिंह बावा यांनी राज्यपालांची भेट घेतली.


Back to top button
Don`t copy text!