
दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२१ । फलटण । फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे शेतकरी हितास्तव व लोकाभिमुख कामकाज आणि योजना आदर्शवत असून केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून बाजार समितीला विशेष सहकार्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करु, अशी ग्वाही सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली.
कृषि उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संचालक चांगदेवराव खरात, सचिव शंकरराव सोनवलकर, पर्यवेक्षक दत्तात्रय डांगे, अक्षय सोडमिसे, विजय भिसे यांनी सातारा येथे खा. श्रीनिवास पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे ते बोलत होते.
केंद्र व राज्याचे शेतकरी विषयक कायदे, बाजार समिती अधिक सक्षम करण्यासाठी राबविणेत येणार्या उपाययोजना, शेती व शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य देवून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांना लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, पेट्रोल पंप योजनेतून तालुक्यात एकूण 12 पेट्रोल पंप सुरु करण्याच्या योजनेतील पहिला पेट्रोल पंप सुरु होताच ग्राहकांनी डिझेल, पेट्रोल खरेदीतून व्यक्त केलेला विश्वास आणि लाभलेला उत्तम नफा आदी विविध बाबी समजावून घेतल्यानंतर बाजार समितीच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करीत खा. श्रीनिवास पाटील यांनी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या टीमचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.