स्थैर्य, कोळकी दि.१२ : तरुणांना वाव द्या असे रामराजेंनी सांगितल्यानंतर नवीन चेहर्यांना उमेदवारी दिली आहे. या सर्व नवीन उमेदवारांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात यशस्वी काम करायचे आहे. कोळकीचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. या ठिकाणच्या लोकसंख्येत रोज वाढ होत आहे. अशा परिस्थितीत देण्यात येणार्या सोयी – सुविधा काही अंशी कमी पडतात. मात्र त्यातून मार्ग काढून आपल्याला एकदिलाने पुढे जायचे आहे. विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आजवर जसे ना.श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्त्वाच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहिलात तसाच विश्वास याही निवडणूकीत दाखवून राजे गटाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना विजयी करा, असेही आवाहन श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी केले.
कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाचे प्रभाग क्रमांक ३ मधील अधिकृत उमेदवार संजय कामठे, सौ.रेश्मा देशमुख व सौ.रुपाली चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ. प्राजक्ता काकडे, सौ. वर्षा शिंदे व गणेश शिंदे आदींची उपस्थिती होती.
निवडणूकीत आरोप – प्रत्यारोप होत राहणार. एका घरात दोन – तीन उमेदवार भाजपनी देवून सत्तांतर करणार असल्याचे सांगत आहेत. म्हणजे सत्तांतर करुन तुम्ही एकाच घरात सत्ता देणार आहात कां ?, असा सवाल सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना केला.