उपचार यंत्रणेला पुरेशी साधनसामग्री मिळवून देऊ – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, अमरावती, दि.२५: कोविड प्रतिबंधासाठी उपचार यंत्रणेचा विस्तार करतानाच जिल्हा परिषदेचे विश्रामगृह येथे कोविड केअर तथा समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राला राज्याच्या महिला व बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दोन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले. हे केंद्र सुसज्ज होण्यासाठी आवश्यक ती सर्व साधनसामग्री मिळवून देऊ, असेही पालकमंत्र्यांनी आज सांगितले.

येथील मालटेकडी परिसरातील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात उभारण्यात आलेल्या कोविड केअर तथा समुपदेशन केंद्राचे लोकार्पण नुकतेच पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. या केंद्रासाठी पालकमंत्र्यांनी स्वत:कडून दोन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले. आमदार बळवंतराव वानखडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण भागात कोविडबाधितांच्या संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपचार यंत्रणेचाही विस्तार करण्यात येत आहे. साथ नियंत्रणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संकल्पना व सहकार्यातून हे कोविड केअर सेंटर सुरु झाले. या केंद्राला आवश्यक ती सर्व साधनसामग्री मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी दिली.

या कोविड केअर सेंटरला सद्यस्थितीत 20 खाटांची सुविधा करण्यात आली आहे. त्यापैकी दोन खाटांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसविण्यात आले आहेत. यापुढे आणखी दहा बेडचे नियोजन याठिकाणी करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून अतितातडीच्या वेळी कोरोनाच्या रुग्णांना याचा उपयोग होईल.

या केंद्रात रुग्णांच्या वैद्यकीय उपचार व देखभालीसाठी एक वैद्यकीय अधिकारी, तीन समुदाय आरोग्य अधिकारी, दोन परिचारिका कार्यरत राहणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!