दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२१ । साखरवाडी । गत काही वर्षांपासून आमच्या कुटुंबीयांना मुद्दामुन त्रास देण्याच्या उद्देशाने पूर्वनियोजित कटकारस्थाने रचुन संकटात आणण्याचे काम तालुक्यातील सत्ताधारी मंडळींने केले आहे. आमची पुर्ण ताकदीने न्यायालयीन लढाई सुरू असुन आगामी काळामध्ये नक्कीच न्यायव्यवस्था आम्हाला न्याय देईल. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही धैर्याने लढाई लढणार आहोत, असे मत तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांनी व्यक्त केले.
साखरवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग नं. २ च्या पोटनिवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील बोलत होते. यावेळी माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, सरपंच रेखा जाधव, उपसरपंच अक्षय रुपनवर, माणिक भोसले, सुरेश पवार, हिरालाल पवार, मारुती माडकर, राजेंद्र शेवाळे, मनोज भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
साखरवाडीचे माजी सरपंच विक्रम भोसले हे सन १९९५ पासून ग्रामपंचयातीवर निवडून जात आहेत. स्वकार्यकर्तृत्वाचा जोरावर भविष्यात फलटण तालुक्याच्या सक्रीय राजकारणात भोसले हे नक्कीच दिसतील, असे ही जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांनी स्पष्ट केले.
साखरवाडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक दोन मोठ्या नेत्यांच्यामध्ये लढत होईल असे वाटत होते. मात्र समोरचा उमेदवार बघता आता फक्त निकालाची औपचारिकता बाकी आहे. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ज्यांच्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात करून आम्हाला अडचणीत आणले, असे मत सुध्दा जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आज पर्यंत आपण केले आहे. भविष्यात सुध्दा यामध्ये खंड पडणार नाही. कारखाना, डिसलरी आमच्या गावात व रोजगार इतर तालुक्यातील लोकांना हा कुठला न्याय ? गावातील प्रत्येक पुढाऱ्याचा बायोडाटा माझ्याकडे आहे. आमच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना धमकावणे बंद करा, अन्यथा जशास तसे उत्तर दिल जाईल, असे मत साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य विक्रम भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी व्यापारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.