मीरा भाईंदर मधील योजना वेगाने पूर्ण करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ एप्रिल २०२३ । मुंबई । मुंबईच्या जवळ असणाऱ्या मीरा भाईंदर शहराचे स्थान हे वेगळे आहे. या शहराच्या विकासाला, प्रगतीला चालना देण्यासाठी व त्याला नियोजनबद्ध स्वरूप देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. राज्य सरकार मीरा भाईंदर शहराच्या मागे भक्कमपणे उभे राहील. या शहरातील योजना अत्यंत वेगाने पूर्ण करू. तसेच प्रलंबित प्रश्नांवर सर्व विभागाची बैठक घेऊन ते सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

आमदार गीता जैन यांच्या प्रयत्नाने भाईंदर पश्चिम येथील नागरी सुविधा क्षेत्र भूखंडावर मुलभूत सोई सुविधाचा विकास या योजनेतील निधीतून व विकास हक्क प्रमाणपत्राच्या मोबदल्यातील महावीर भवन इमारतीचे भूमीपूजन, मिरारोड पूर्व आरक्षण क्र.210/211 या जागेवरील हॉस्पीटल इमारतीचे भूमीपूजन, भाईंदर पश्चिम उड्डाणपूल खालील पशु-पक्षी उपचार केंद्राचे लोकार्पण, भाईंदर पश्चिम उड्डाणपूल खालील सी.सी.टी.व्ही. नियंत्रण कक्ष लोकार्पण, भारतरत्न उस्ताद बिस्मिला खाँ उर्दू शाळा, मिरागाव इमारत लोकार्पण, काशिमीरा उड्डाणपूला खालील संत रविदास महाराज उद्यानाचा लोकार्पण आदी विकास कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, राजन सिंग,माजी महापौर डिंपल मेहता, जोत्स्ना हंसनाळे, हसमुख गेहलोत, रवी व्यास, राजू भोईर, महापालिका आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अनिकेत मनोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मीरा भाईंदर शहरवासियाना अक्षय तृतीया, ईद, महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईचा विस्तार होताना ठाण्यासारखे महानगर शेजारी उभे राहिले. त्यातील मीरा भाईंदर सारख्या जुळ्या शहरावर सुद्धा लोकसंख्येचा ताण वाढला. मुंबईतील नागरिक चांगल्या निवासासाठी मीरा भाईंदर, वसई विरार मध्ये येऊ लागले. त्यामुळे वेगाने वाढणाऱ्या या शहरात त्या काळात आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत . मात्र 2014 नंतर आम्ही या शहराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांपासून हे शहर झपाट्याने बदलत आहे. या शहराला आधुनिक स्वरूप देण्याचे काम प्रशासनाने व लोकप्रतिनिधी करत आहेत.

आज अनेक प्रकल्प या शहरात सुरू आहेत. मीरा भाईंदर शहरात उभे राहणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी, रेडिएशन या सारखे उपचार व्हावेत. अतिशय परिपूर्ण हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक तो निधी राज्य शासन देईल. शहरात सीसीटीव्ही उभारणी व इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरसाठी सुद्धा निधी देऊ. सर्व्हेलन्स सेंटर मुळे रस्त्यावर घडणारे गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहतुकीचे प्रश्न सुटण्याससही मदत होते. वाहतुकीला शिस्त लागते.

मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाची इमारत यावर्षी होईल. त्या बरोबरच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान व इतर सुविधाही निर्माण करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या शहराच्या पुढील 25 ते 30 वर्षात वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून त्याला आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी प्रकल्प, योजना सुरू केल्या. सध्या या शहरासाठी पाण्याची अडचण आहे. मात्र सुर्या प्रकल्पामुळे पुढील 25 वर्षात वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेल एवढा पाणी पुरवठा होणार आहे. त्यावेळी 24 तास पाणी शहराला मिळू शकेल. या शहरातील मेट्रो च्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ही मेट्रो आता उत्तन पर्यंत पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला मेट्रोचा लाभ होईल. एमएमआर रिजनमध्ये वाहतूक सुविधा वाढविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे. वाहतुकीची एकात्मिक व्यवस्था उभे करण्यात येत आहे. मीरा भाईंदर शहराला आणखी 50 इलेक्ट्रिक बस देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आमदार गीता जैन म्हणाल्या की, राज्य शासनाने अगदी थोडक्या काळात या शहराला भरपूर निधी दिला आहे. या शासनाने सुमारे २५०० कोटींचा निधी या शहरासाठी दिला आहे. हा निधी देण्यात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हातभार आहे. कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. कॅन्सर वर येथे आधुनिक उपचार व्हावेत यासाठी राज्य शासनाने सहकार्य करावे.
सूर्या प्रकल्प पूर्ण होईपर्यंत शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी लक्ष घालावे. तसेच टोल मुक्त व कचरा मुक्त शहर करण्यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी मदत करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

माजी आमदार श्री. मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित कामे या शासनाच्या काळात वेगाने पूर्ण होत आहेत. बाकीची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी व त्या कामांना चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठक घ्यावी, अशी मागणी श्री. मेहता यांनी यावेळी केली.

प्रास्ताविकात आयुक्त श्री. ढोले यांनी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामाची माहिती दिली. मीरा भाईंदर शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुर्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून काम वेगाने सुरू आहे. तसेच इलेक्ट्रिक बस व मेट्रो साठीही मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. शहरातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी 884 कोटी रुपये निधी मिळाला असून लवकरच येथील सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील. शहरात लवकरच ११ आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू होणार असल्याचेही श्री. ढोले यांनी यावेळी सांगितले.

आमदार गीता जैन व आयुक्त श्री ढोले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अतिरिक्त आयुक्त श्री. पानपट्टे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!