दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । मुंबई । राज्यातील अंशत: अनुदानित शाळेत कार्यरत असणारे स्थायी कर्मचारी अतिरिक्त ठरल्यास त्यांना सेवा संरक्षण देण्याबाबत सेवा शर्तींमध्ये सुधारणेची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करू, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य श्री. किरण सरनाईक यांनी याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना श्री.केसरकर यांनी ही माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नागोराव गाणार, रणजित पाटील यांनी सहभाग घेतला.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले, अंशत: अनुदानित शाळेत कार्यरत असणारे स्थायी कर्मचारी अतिरिक्त ठरल्यास त्यांच्या सेवेस संरक्षण देऊन अन्य शाळेत समायोजन करण्याची तरतूद नियमावलीमध्ये नाही. या वस्तुस्थितीच्या अनुषंगाने आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 24 जून 2021 रोजीच्या पत्रान्वये त्यांच्या अभिप्रायांसह अहवाल शासनास सादर केला आहे. सदर अहवाल विचारात घेऊन, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, 1981 मधील नियम 26 मध्ये सुधारणा प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली.