स्वयंपाक करण्यासाठी आणि फक्त मुले जन्माला घालण्यासाठी आमचा जन्म झाला नाही; अफगाणी महिलांचा आक्रोश

शब्दबद्ध केलाय फलटणच्या लेखिकांनी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 13 डिसेंबर 2023 | फलटण | सौ. शारदा भोसले |

अफगाणिस्तानात २०२१ पासुन तालिबानशासित राजवट आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. स्त्री शिक्षण व नोकऱ्या सुरू ठेऊ असे उदारमतवादी आश्वासन सुरूवातीला तालिबानने दिले परंतु थोड्याच अवधीत तेथील कट्टरपंथी गटाने मात्र स्त्रीयांचे हक्क काढुन घेतले”

आज नव्हे तर गेली कित्येक वर्ष अफगाणिस्तानातल्या स्त्रीया जी घुसमट सहन करतायत त्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. तिनं जे सोसलयं ते अनेक पुस्तके – लेख यातुन वाचलं… जशी – जशी मी त्यांची करुण कहाणी वाचत गेले तसं तसं तिच्या दुःखाच आभाळ नजरेपुढं अधिकच गडद होत गेलं. वाचताना मनं सुन्न झालं; बैचेन झालं; वाचन संपल तरी ती भयानकता विस्मरणात जात नव्हती. बेसुमार वाचलं त्यातलं काही लिहावंस वाटल म्हणून हा लेखनप्रपंच…

आम्ही या देशाचा अर्धा भाग आहोत. घरी राहण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी आणि फक्त मुले जन्माला घालण्यासाठी आमचा जन्म झाला नाही. आम्हाला आमच्या नोकऱ्या परत द्या. आम्हाला काम करू द्या शिकू द्या. हृदय पिळवटून टाकणारा हा आक्रोश आहे; साहसी तितक्याच मजबुत अफगाणि स्त्रीचा….. तालिबान विरोधात.

अफगाणिस्तानातील तालिबानच्या छळवादी राजवटीत परिस्थितीपुढं अगतिक होऊन आंधाराच्या साम्राज्यात कण-कण जिवंत पणीच मरणयातना सोसणा-या अफगाणि स्त्रीचा हा आवाज हा आक्रोश–आपल्याला विचारप्रवण करतो स्वतःच्याच आस्तित्वाला लागलेली उतरती कळा पाहण्याची वेळ जिच्यावर आली त्या अफगाणि स्त्रीचा हा आर्त स्वर… क्रुर भयावह तालिबानी राजवटीची अमानुष वागणूक, जाचक कायदे आणि सतत नियमांचा अंकुश ठेऊन स्ञी-दमन करु पाहणा-या या निर्दयी राजवटीत त्यांना श्वास घेणं देखील दुरापास्त झालंय.. प्रदीर्घ युद्ध, सततचा दहशतवाद ,बाँब आणि ग्रेनेड हल्ले यांतुन जीव वाचलाचं तर समोर काळ उभा तालिबानची दहशत.. अफगाणिस्तान हा आज स्त्री म्हणून जगण्यासाठी जगातील सर्वात वाईट ठिकाण बनला आहे.. केवळ स्त्री म्हणून इथं जन्माला येणं हे तिच्या भाळी जणू दुर्दैवच ठरतयं रोजच नवे निर्बंध नवा फतवा. स्त्री म्हणून सन्मानानानं जगण नाकारण्याचा आणि जगण्याचं मनोधैर्य नष्ट करण्याचा तालिबानचा हा क्रुर खेळ.. क्रौर्याच्या या भयंकर दडपशाहीन तिचं समुहजीवनातील अस्तित्व पार पुसुन टाकलयं…नाकारलयं.

१९९६ ते२००१ या काळात तालिबान सत्तेवर येताचं स्त्रीयांच जग हादरलं बेसुमार दडपशाही आणि धाक त्यांनी भोगला.. त्यावेळीही स्त्री जीवनाची तीव्र ससेहोलपट- शोकांतिका झाली. तालिबानने सत्तेवर येताच स्त्रीयांना लक्ष्य केले..आत्यंतिक कठोर नियम आणि अंकुश ठेऊन स्त्रीयांची मुस्कटदाबी सुरू केली. त्यावेळचा सोसलेला घुसमट आणि छळ कमी की काय म्हणून परत एकदा अफगाणिस्तानात अशरफ घनी यांना सत्तेतुन पायउतार व्हावे लागले(२०२१) व तालिबानने देशावर कब्जा केला. अशरफ घनी देश सोडून पळाले ताजिकिस्तानात गेले .आपला कुटुंब कबिला घेऊन ते सुरक्षित ठिकाणी गेले . जाताना बरचं काही घेऊन गेले अशा बातम्या ऐकल्या… अशा कठोर वेळी त्यांनी नागरिकांना वा-यावर सोडल अशी टिका झाली.देशाचं काही काळ अर्थमंञी पद सांभाळलेला हा नेता ..अफगाणिस्तान परत एकदा तालिबानच्या अधिपत्याखाली आले आहे आणि पुन्हा एकदा स्त्रीजीवनाचा अंधाऱ्या कोठडीचा दुःखद भविष्यकाळ सुरू झाला आहे .तीच परिस्थिती तेच निर्बंध आणि तिचं दशा—- “प्रकाश, उन्न्ती आणि स्वातंत्र्याचा प्रकाश नाहीच का आमच्या नशीबात एका अफगाणि स्त्री चा कष्टी स्वर”..

या बंधनयुक्त राजवटीत दिवस काय अन् राञ काय सारखचं. स्त्रीया असहाय्यतेच्या ,दुर्बलतेच्या, भीतीच्या भीषण छायेत आकसुन गेल्यात..दिवस उजाडताच आज काय नवा नियम निघतोय हेच पहायचं रोज जीवघेणी संकट उभी राहतायत. निर्बंध तोडले तर कठोर शिक्षेचा धाक आहेच. शिक्षेची भीती आणि वर पोटापाण्याचा न सुटलेला प्रश्न सतावतोय. एकटी स्त्री बाहेर पडू शृकत नाही. तालिबानने नोकऱ्या काढुन घेतल्यात. विधवा स्ञीपुढं फार मोठ आव्हान आहे. काही माध्यम स्ञीयांपर्यंत पोहोचली नफिजा म्हणते “निळं आकाश तर किती दिवसं झालं बघितलचं नाही , आकाशच जणू विसरलेय, सुंदर गोष्टी आता फारशा आठवतच नाहीत उरलाय फक्त दहशतीचा काळोख” ..”तालिबाननं आम्हांला घरात डांबलय आमचं शिक्षण बंद केलयं..सहावीच्या पुढं मुली आता घरीच आहेत .विद्यापीठांना तर कधीच कुलुपे लागलीत..शिक्षणाचा हक्क नाकारुन त्यांनी आम्हांच्या आत्म्यावर वार केलायं ..शिक्षण नाही म्हणजे सन्मान नाही त्यापेक्षा मरण चांगलं ..शाळा बंद झाल्या म्हणून वाचनालयात जावं म्हटलं तर धमक्या येऊ लागल्या .महिलांना पुस्तक वाचण्याचा अधिकार नाही असं सुनवण्यात आलं शेवटी लायब्ररीही ब़ंद झाली .मुलींच्या शाळा बंद करणारा अफगाणिस्तान हा जगातील एकमेव देश ठरला आहे .प्रतिभा काव्य आणि बुद्धिमत्ता घरात कोंडली आहे शिकलेल्या स्त्रीया शक्तीशाली होतील आणि आम्हांला जाब विचारतील याची त्यांना भीती वाटते.शिक्षणासाठी स्त्रीयांनी भूमिगत शाळा शोधल्यात पण त्यातही जीवाला धोका आहे कमालीची गुप्तता ठेवावी लागते .भूमिगत शाळांच जाळं वाढविण्यात पश्ताना दुर्रानी पुढं आहेत ..जीवावर बेतणा-या या धाडसास कौतुक करावं तेवढं थोडचं.. (मागे मी jeanet winter यांची ‘नसरीनची गुप्त शाळा’ ही सचिञ चित्र कथा शेअर केली होती त्यावरुन धोकादायक परिस्थितीत या शाळा कशा चालतात हे लक्षात येत) [माध्यम जेव्हा स्ञीयांची मुलाखत घेतात तेव्हा सुरक्षिततेसाठी नावं व ओळख लपवितात]

नफिसा म्हणते स्वातंत्र्य हा भुतकाळातला शब्द झालायं ..आम्हांला प्राण्यांचा हेवा वाटतोय ते निळ्या आकाशाखाली हिंडतायतं मन मानेल तेव्हा इकडून -तिकडे जातायतं पण आम्ही नाही ..प्राण्यांपेक्षा आमची अवस्था बिकट झालीय..काबुलच्या बागा आता फक्त पुरूषांसाठीचं खुल्या आहेत .नोकऱ्या तर कधीच काढुन घेतल्यात.प्रत्येक क्षेत्रात आम्हांला मज्जाव केलायं.आम्ही एकट्या कुठचं जाऊ शकत नाही नखशिखांत घातलेला अंगभर कापडी पोशाख हाच आमचा तुरुंग झालायं..काही स्त्रीया देश सोडून पळाल्या पण आमच्या ते नशिबी नव्हतं..हे साकंळलेल जीवन आता नकोसं झालयं सतत भीती आणि दडपण..स्वप्न भंगली आहेत दिवस आणि रात्रीत फरकच राहीला नाही ..

तालिबानच्या राजवटीला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत .संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधींनी ६ मार्च २०२३ ला एक अहवाल प्रसिद्ध केला त्यात अफगाणिस्तानातील परिस्थिती खालावत असुन महिलांची दुर्दशा आधोरेखीत केली .हा देश महिलांसाठी सर्वाधिक दमन करणारा आणि दडपशाही करणारा देश ठरला आहे ..

UN- Afganistan is worlds most repressive country for women..

घरगुती हिंसाचार व गरीबीच्या अंतहीन चक्रात अडकल्याने महिलांच्या मानसिक आरोग्याची कमालीची हेळसांड झाली आहे .निर्बंधात अडकल्याने बाहेरून मानवतावादी संस्थांकडून मिळणारी मदतही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीय. आत्महत्या दर देखील वाढला आहे . स्त्री आत्महत्येचे प्रमाण ८०% वर गेलं आहे …इथं बाळंतपण घरीच होतात नशीब बलवत्तर तर ती वाचते जगातील सर्वाधिक मातामृत्यू असणारे ठिकाण ..स्त्री पराधीनच असते का?
महिलांना कधीच पर्याय नसतो का?

जाता-जाता लेखाच्या शेवटी सुस्मिता बॕनर्जी (भारतीय लेखिका) यांच्या काबुलीवाल्याची बंगाली बायको मूळ पुस्तक ‘काबुलीवालार बंगाली बऊ’ या पुस्तकातील काही ओळी अधोरेखीत करते.. “या देशात येण्यासाठी रस्ता आहे पण जाण्यासाठी नाही ..मी जाँबाजबरोबर इथं आलेय खरी पण तो आता इथुन गेलायं.त्याच्या भावांनी माझा छळ मांडलाय .रोज उपास घडतायत मारझोडही होतेय. बाहेर बर्फ भूरभुरतयं पण शेकोटीसाठी दोन लाकडही मिळेनात, सध्या मी इथं कैदेतच आहे .कारण हा सबंध देशच एक तुरुंग आहे .

हे सगळं संपाव या वेदनादायक कोंडीतुन तुम्हा सर्वांची सुटका व्हावी ही सदिच्छा…

मध्यंतरी मध्य पूर्वेतलं (middle-east) बरंच वाचल. वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती अशी की काहींच्या आयुष्यात दुःखाची सुरवात होते पण शेवट कधीच होत नाही. इथल्या स्ञियांची दुःखही अशीच अंतहीन.. अंत कधी हे माहित नाही … त्या मुळचं इथं धाडसाच्या, हिमतीच्या वेगळ्या कहाण्या घडतात. लिहिल्या जातात. एखाद्या स्त्रीला इतकं सारं सहन करावं लागतं यांवर विश्वासच बसत नाही . जगातल्या सर्वच स्ञिया संघर्ष करत आहेत समस्यांना तोंड देत आहेत याबद्दल दुमत नाही..वरील लेखात अफगाणि स्ञियांची ससेहोलपट आपण वाचली अशाच काही स्त्रीया आहेत ज्यांनी आपल्या लेखणीतुन हे सारं जगासमोर आणलं …

मनं होरपळलेल्या अतीव वेदनांची वास्तव कथा मध्य पूर्वेत असताना तिथल्या सामाजिक ,राजकीय गोष्टींचा अनुभव घेतलेल्या स्त्री लेखिकांनी पुस्तक रुपाने जगापुढे आणली. अनेक कथा-कादंब-यातुन लेखांमधुन ते सारं ख-या अर्थाने माझ्या पुढे उलगडत गेलं .तिथल्या महिलांची विशेषतः येमेन,अफगाणिस्तान, सोमालिया, सौदी अरेबिया,इराण, इराक सिरिया येथिल स्ञीयांच्या साहस व संघर्षाची जिद्दीची गाथा स्मरत गेली… त्यांतुन तिथले स्त्री विषयक कायदे,त्यांना मिळणारी वागणूक,हे सारं समजलं…

परक्या संस्कृतीतुन मध्य आखातात गेलेल्या स्त्री लेखिकांनी यांवर भरभरून लिहिले आहे . जागतिक दर्जाची अमेरिकन लेखिका Betty Mhamoody यांची ‘Not withought my daughter’ ही सर्वञ गाजलेली कादंबरी हे पुस्तक मध्य आखात व पाश्चात्त्य संस्कृतीतील भिन्नता प्रकर्षाने जाणवून देते.
बुरख्यामागचे साम्राज्य हे कारमेन बिन लादेन या हिम्मतवान लेखिकेचे छोटेसेच पण महत्त्वपूर्ण अर्थाचे पुस्तक आपल्याला कारमेनने सौदी अरेबियात सोसलेल्या कौटुंबिक छळाचा अनुभव सांगते.पुरुषप्रधान संस्कृतीमुळे कारमेनला आपल्या मुली घेऊन सासरच्या देशातुन परागंदा व्हावे लागले.
इस्लामिक स्टेट या क्रुर दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या व अनन्वित लैंगिक अत्याचार केलेल्या नादिया मुराद या ‘लेखिकेचे द लास्ट गर्ल’ हे पुस्तक वाचल्यावर मन विषण्ण होते.

प्रचंड वेदना दुःख आणि प्रसंगी अन्याय सहन केलेल्या या कर्तबगार लेखिकांनी आपला आक्रोश लेखनीतुन व्यक्त केला मध्य पूर्व देशातल्या स्ञियांच्या अतीव वेदनेची साक्ष ही पुस्तके देतात. त्यांच्या वेदनेचा आवाज या पुस्तकांमधुन जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला म्हणूनच ही पुस्तके अनेक भाषांमध्ये प्रकाशित झाली. सर्वाधिक खपाचा विक्रमी उच्चांक या पुस्तकांनी गाठला.

स्ञियांनी भोगलेल्या प्रचंड वेदना आणि जीवावर बेतणा-या अदभुत साहसाने भारलेली ही पुस्तके निश्चितच आत्मप्रेरक आणि दिशादर्शक ठरतील यांत शंका नाही, प्रत्येक स्त्रीने अशी पुस्तके जरुर वाचावी.


Back to top button
Don`t copy text!