
सातारा – निबंध स्पर्धेतील बक्षीस विजेते स्पर्धकांसमवेत शिरीष चिटणीस, संदीप श्रोत्री, उद्योजिका क्षमा जोशी व इतर.
स्थैर्य, सातारा, दि. 25 डिसेंबर : आम्ही पुस्तप्रेमी समूहाकडून वाचन संस्कृतीची जोपासना केली जात आहे. आधुनिक काळात मोबाईलच्या प्रभावाखाली असलेल्या तरुण पिढीला दिशा देण्याचे काम हा समूह करत आहे असे उद्गार कूपर उद्योग समूहाचे वरिष्ठ व्यवस्थापक सचिन खटावकर यांनी काढले.
आम्ही पुस्तप्रेमी समूहाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिला उद्योजिका क्षमा जोशी, राजकुमार निकम,डॉ संदीप श्रोत्री,अशोक वाळिंबे, शिरीष चिटणीस श्रीराम नानल, मुकुंद फडके उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व बक्षिसपात्र स्पर्धकांचा ट्रॉफी,प्रमाणपत्र आणि पुस्तके देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धकांना ‘बक्षीस म्हणून पुस्तक!’ डॉ. आदिती काळमेख आणि डॉ. संदीप श्रोत्री यांनी लिहिलेली पुस्तके देण्यात आली.
सचिन खटावकर म्हणाले,वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आणि ती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत, कूपर कार्पोरेशनही कायम अशा उपक्रमाच्या पाठीशी असते.सातारा जिल्ह्यातील अनेक शाळाना संपूर्ण ग्रंथालय पुरवण्याचे काम कूपर कोर्पोरेशनने केले आहे.आम्ही पुस्तप्रेमी समूहाकडून आयोजित निबंध स्पर्धा असाच आदर्श उपक्रम आहे. विद्यार्थांनी अशा उपक्रमांचा लाभ घेऊन आपले वाचा वाढवायला हवे.
क्षमा जोशी यांनीही आम्ही पुस्तप्रेमी समूहाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कोणत्याही विद्यार्थ्याला शैक्षणिक मदतीची गरज असेल तर त्यांनी कधीही संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
राजकुमार निकम म्हणाले,शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे वाचन वाढवण्याची जबाबदारी घ्यायला हवी. आपला विद्यार्थी काय वाचतोय यावर शिक्षकांनी लक्ष ठेवायला हवे. विद्यार्थी चांगले कसे लिहू शकतील याचे मार्गदर्शन शिक्षकांनी करायला हवे
डॉ संदीप श्रोत्री म्हणाले,सातारा येथे होणार्या 99 व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही ही स्पर्धा आयोजित केली,या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्याच्या कानाकोपर्यातून निबंध आले.आज या स्पर्धेचे बक्षीस वितरण होत आहे याचा आनंद आहे. संबंधित शाळा आणि महाविद्यालये यांनी बक्षिसपात्र निबंधाना आपल्या वार्षिक नियतकालिकात स्थान द्यावे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीराम नानल यांनी केले. आम्ही पुस्तप्रेमी समूहाच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली आणि ही स्पर्धा घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला.
या स्पर्धेचे परीक्षक अशोक वाळिंबे,डॉ आदिती काळमेख, यांनी मनोगत व्यक्त करून सहभागी स्पर्धकांना काही सूचना केल्या राजेंद्र आफळेही उपस्थित होते शिरीष चिटणीस यांनी आभार मानले
या सोहळ्यातील एक प्रसंग तर काळजाला स्पर्श करून गेला. आपल्या मुलाला बक्षीस मिळाले आहे हे कळताच, ओतूरसारख्या लांबच्या ठिकाणाहून आई वडील आले होते केवळ आपल्या मुलाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी म्हणून त्यांनी केलेला हा प्रवास वाचन संस्कृतीच्या ओढीचा जिवंत पुरावा होता. विशेष म्हणजे या स्पर्धेत दोन वेगवेगळ्या वयोगटांत आई अश्विनी फडणीस आणि त्यांच्या मुलाला स्वतंत्रपणे बक्षीस मिळावे, हा योगायोग म्हणजे पिढ्यांमधील वाचनाची साखळी घट्ट होत असल्याचेच संकेत आहेत. सत्काराला उत्तर देताना एक शाळकरी मुलगी आपल्या भाषणात एक अनमोल वाक्य बोलून गेली. वेळ घालवण्यासाठी म्हणून पुस्तक वाचण्यापेक्षा पुस्तक वाचण्यासाठी म्हणून वेळ काढा असे आवाहन तिने करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
