शहराचा विकास करणारे नगरसेवक हवेत – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले


स्थैर्य, सातारा, दि.28 ऑक्टोबर : नगरपालिकेत केवळ बिलं काढणारा नगरसेवक नको, तर शहराच्या विकासासाठी काम करणारा नगरसेवक हवा. या स्पष्ट शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीची आपली भूमिका मांडली. निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर व्हायच्या असल्या तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले आणि भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्यासह लवकरच वरिष्ठांची बैठक घेऊन योग्य ती रणनीती आखली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विकासकामांच्या नावाखाली होणार्‍या तकलादू खर्चावर आणि माझा वार्ड, माझी गल्ली या मर्यादित व्हिजनवर त्यांनी सडकून टीका केली. यंदा नव्या उमेदवारांना संधी दिली जाणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, यंदा इच्छुकांची संख्या मोठी आहे, हे आपण पाहत आहोत.

परंतु, नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पद पाहिजे म्हणून काम करण्यात अर्थ नाही. त्या पदाला त्या व्यक्तीने चांगल्या पद्धतीने न्याय दिला पाहिजे. निवडून आल्यानंतर पाच वर्षे त्यांनी शहराच्या विकासासाठीच काम केले पाहिजे. पालिका निवडणुकीच्या अजून तारखा जाहीर व्हायच्या आहेत. मात्र लवकरच वरिष्ठांच्या उपस्थितीत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. वार्ड व गल्लीपुरता विचार करणारा, बिले काढणारा नगरसेवक पालिकेत नको, असेही ते म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!