राज्यघटना आणि संविधानातील अपेक्षित भारत घडवण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागेल – डॉ.बाबा आढाव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१२ एप्रिल २०२२ । सातारा । आज देशाच्या संविधानात पुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे .राजनीतीची चमत्कारिकता ही आपण अनुभवत आहोत एक दिवस शरद पवार मोदींशी चर्चा वार्तालाप करतात तर दुसर्‍या दिवशी त्यांच्या घरावर चपलांचे हार भिरकावले जातात . करोनापेक्षाही वैचारिक विषमता भयानक आहे. आपल्याला अपेक्षित संविधानातील भारत घडवायचा असेल तर जे आजपर्यंत झालेल्या चळवळीचे आधार आहेत त्यांचीच मदत घेऊन घडवण्याची गरज आहे ,असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक विचारवंत डॉ .बाबा आढाव यांनी केले.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ प्रबोधनकार सत्यशोधक प्रार्थना समाजाचे प्रणेते दलित मित्र रा.ना.चव्हाण यांच्या 29 व्या स्मृतिदिनी 24वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार पुणे येथील श्रमिक पत्रकार संघाच्या इमारतीमध्ये कलबुर्गी -कर्नाटक येथील प्राचार्य भालचंद्र शिंदे यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ .बाबा आढाव बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.सुनीलकुमार लवटे, डॉ.सदानंद मोरे, रा.ना.चव्हाण प्रतिष्ठानचे विश्वस्त सतीश कुलकर्णी, रमेश चव्हाण,पुरस्कार प्राप्त करणारे प्राचार्य भालचंद्र शिंदे ,त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.संध्या शिंदे,प्रा.राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

महात्मा फुले यांच्या अखंडाचे वाचन सौ.जोग यांनी केल्यानंतर प्रास्ताविक भाषण प्रतिष्ठानचे विश्वस्त सतीश कुलकर्णी यांनी करताना वाईत रा.ना.चव्हाण यांनी रुजवलेल्या वैचारिक रोपट्याची मुळे आता सर्व राज्यात सर्वदूर पसरत असून सतत त्याचा सतत पाठपुरावा रा.ना. यांनी केला. चिकित्सा, पडताळणी आणि सत्य ही जीवनाची त्रिसूत्री विचारात आणणारे ते होते. साक्षेपी समीक्षक म्हणून आज रमेश चव्हाण यांच्या या लेखन कार्याला पुस्तक रूपाने पुढे आणत आहेत हे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे प्राचार्य भालचंद्र शिंदे हे सडेतोड मते मांडणारे असून कर्नाटकात राहूनही मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम प्राचार्य शिंदे करत आहेत असे सांगितले.
आपले मनोगत व्यक्त करताना रमेश चव्हाण यांनी रा. ना. चव्हाण यांच्या प्रकाशित केलेल्या पुस्तकातून लेखनाची चांगली समीक्षा होईल अशी अपेक्षा करत सत्यशोधक समाज कसा विकसित होईल, याला व्यापक रूप देण्यासाठी रा.ना.चव्हाण कष्टले तसेच सत्य जाणतो तो सत्यशोधक अशी व्याख्या ही त्यांनी केली होती. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादात सत्यशोधक समाज पडला तर प्रगती खुंटेल. नवसमाज निर्मिती साठी सामाजिक प्रबोधन महत्त्वाचे आहे हे त्यांनी जाणले. सत्यशोधक चळवळीचा अपेक्षित हवा तेवढा इतिहास पुढे आलेला नाही अशी अपेक्षा आणि खंतही चव्हाण यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी प्राचार्य राम जगताप यांनी मायलेकी – बापलेकी या पुस्तकाबद्दल लिहिताना आपणाला सतत दाब जाणवत होता.लेखनातून आनंद लुटला असे आपल्या मनोगतात सांगितले. याच कार्यक्रमात रमेश चव्हाण संपादित ..महात्मा फुले सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन भाग-2 आणि.. सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे ..या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ ही ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार प्राचार्य भालचंद्र शिंदे यांना प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .शाल, श्रीफळ ,स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी प्राचार्य शिंदे यांच्या पत्नी सौ. संध्या शिंदे यांनाही साडी चोळी आणि पुष्पहार पुष्पगु च्छ देऊन निशिगंधा चव्हाण यांचे हस्ते गौरवण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्कृष्ट वांग्मय निर्मितीसाठीचे रा.ना. चव्हाण पुरस्कार मुंबई येथील राम जगताप यांना मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना प्राचार्य भालचंद्र शिंदे म्हणाले की ,मी कर्नाटकात राहात असूनही मराठी आणि त्यातही रा. ना. चव्हाण आणि महर्षी शिंदे यांच्या लेखनाला गती देण्याचे काम करत आहे .महर्षी शिंदे हे परखड व्यक्तिमत्व होते. खरंच अस्पृश्यांसाठी झटणारे ते वादळ होते मात्र ते वादळ असे विरले का? हा प्रश्न मला सातत्याने पडतो. शिंदे आणि चव्हाण हे दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिले यावर अभ्यास करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात असूनही महर्षी शिंदे आणि रा. ना. चव्हाण हे दुर्लक्षित उपेक्षित राहिले हा प्रश्न मी महाराष्ट्रवासीयांना करत आहे जसे महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकर ही त्रिसूत्री तशी कर्नाटकात बुद्ध- बसवेश्वर आणि आंबेडकर ही त्रिसूत्री राबवली जाते. आता कोणता नारा द्यायचा तो तुम्ही ठरवा .आठशे वर्षांपूर्वी कर्नाटकात बसवेश्वरांनी स्त्री-पुरुष समानता ही क्रांतिकारक गोष्ट पुढे आणली .पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात मात्र प्रत्यक्षात बसवेश्वरांचे म्हणणे आचरणात आणणे आज काळाची गरज आहे .अलंप्रभु सारख्या शुद्र जातीच्या माणसाला बसवेश्वरांनी शून्य पिठाचे प्रमुख केले आज एखाद्या तबला वाजवणारा किंवा अस्पृश्याला महाराष्ट्र अध्यक्ष करेल का हा प्रश्न मला पडतो असे शिंदे म्हणाले. मी असे काही वेड्यासारखे बोलत आहे असे तुम्हाला वाटेल मात्र ते वास्तव आहे .महाराष्ट्रापासून दूर असूनही मी माझे कार्य सुरू ठेवले आहे असेही शिंदे म्हणाले.

याप्रसंगी बोलताना प्राचार्य सुनीलकुमार लवटे म्हणाले की, प्राचार्य शिंदे यांनी आपल्या पुढे उपस्थित केलेले प्रश्नांचे उत्तर हे पुण्याचे डॉ. सदानंद मोरे देतील .कारण पुण्याचे प्रश्न पुण्याने सोडवलेले बरे . रा.ना.चव्हाण, महर्षि शिंदे हे मूलतः सत्यशोधक समाजाचे प्रवर्तक होते .त्यांच्या विचारांना आज आपण पुढे नेण्याचे काम करणे गरजेचे आहे . अस्पृश्य ता या केवळ मागासलेल्या जातीत नसून कुमारी माता, परित्यक्ता ,अनवट रस्ता निवडणाऱ्यानाही अस्पृश्य मानले जात आहे. हा इतिहास बदलण्याचे काम रा.ना. चव्हाण आणि महर्षी शिंदे यांनी केले .मात्र तरीही ते उपेक्षित राहिले याची खंत वाटते. या दोन विचार प्रवर्तकांची बहुजनांनी ही उपेक्षाच केली, आणि वंचितांनिही ही उपेक्षाच केली आहे .सध्याच्या वर्तमानात जात, धर्म, भाषा ,प्रांत यावरच आपण विचार करत आहोत माणसातला माणूस म्हणून आपण विचार करतो का हे पाहावे लागेल ामा चव्‍हाण हे खऱ्या अर्थाने मानवतावादी समाज सुधारक होते असेच म्हणावे लागेल.
ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांनी प्राचार्य भालचंद्र शिंदे यांनी उपेक्षित केलेला प्रश्नांमुळे खऱ्या अर्थाने आमचे कान टोचले असेच म्हणावे लागेल असे सांगत मराठी मुळे कन्नड भाषा चेपली अशा अर्थाने मुंबई विद्यापीठात महर्षी शिंदे यांनी मागणी केलेली कन्नड भाषेची मागणी ही दूर राहिली मराठी राज्य उत्तर कर्नाटकात वाढत असताना कन्नड ही भाषा गरीब गाय वाटली आणि तरीही याठिकाणी गरीब गायीने शिंगे रोखली .संघर्ष वाढत गेला महाराष्ट्राची लोक यात्रा या माझ्या आगामी पुस्तकात मी या प्रश्नाचं सविस्तर ऊहापोह केला असून हे पुस्तक पुढील महिन्यात प्रकाशित होत आहे असे सांगितले .

वडिलांचे कार्य रमेश चव्हाण अतिशय आदर्शपणे करत असून मी या पुरस्काराचा मानकरी ठरलो, त्याचा आनंद होतो आणि खऱ्या अर्थाने रमेश चव्हाण हे आदर्श सेवा करणारे पुंडलिक आहेत. जे आज वडिलांची ,पूर्वजांची सेवा करत असून हा चांगला मार्ग चव्हाण कुटुंबियांनी जोपासला वृद्धिंगत केला. कारण एखाद्या लेखकाच्या मृत्युपश्चात एवढी मोठी लेखन संपदा प्रकाशित करणे हा मोठा विक्रमच म्हणावा लागेल असेही डॉ. मोरे म्हणाले जोपर्यंत रा.ना.चे लेखन प्रकाशित होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा इतिहास समाजापर्यंत पोहोचणार नाही हे लेखन विशेष पुस्तकातून येत आहे. डॉ. आढाव यांनी ही सत्यशोधक चळवळीची कागदपत्रे जाणून घेत या कार्याला गती दिली त्याचेही कौतुक वाटते.रा.ना. चव्हाण हे सत्यशोधक चळवळीचा चालताबोलता ज्ञानकोष होता असेच म्हणावे लागेल.असे डॉ. मोरे म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात डॉ बाबा आढाव यांनी सत्यशोधक चळवळीचा इतिहास का रखडला याचा विचार करा उपेक्षा हा शब्द खटकतो आहे .कृतज्ञता व्यक्त करताना चांगले म्हणण्याची वेळ येताना जात आडवी येते .ज्यांनी ही व्यवस्था निर्माण केली त्यांनाच आम्ही आमच्या आजही डोक्यावर घेतले आहे. भाषिक वाद किरकोळ आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार दिली ,महात्मा फुल्यांनी पाटी-पेन्सिल दिली आणि डॉ. आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला हे जर झाले नसते तर आजचा सुधारलेला महाराष्ट्र आपण पाहू शकलो नसतो. आजवर झालेल्या दलित ,सत्यशोधक आणि ब्राह्मण चळवळींचा ही इतिहास पुढे येणे हे महत्त्वाचे आहे. जे अद्याप अंधारात आहे ते पुढे आलेले नाही .सत्यशोधक चळवळ म्हणजे ब्राह्मणांना शिव्या देणे हाच यांचा धंदा होता.

अशा विचारांच्या हीन परिस्थितीत राज्यघटना शिल्लक राहणार का हा प्रश्न पुढे येतो .मूल्यांचा स्वातंत्र्य, बंधुता, समता ,बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञानाधिष्ठित आता या मूल्यावर चांगले म्हणायचे असले तरी जात आडवी येते अशी विचित्र व्यवस्था बनवली गेली आहे .कुठे ही जात आडवी येते आहे. आपण विज्ञाननिष्ठा करत नाही करोना च्या काळामध्ये जात होती का? करोना आला की जात आडवी आली का? आता विज्ञानाने निर्माण केलेले संस्कार शिकून मांडणी करून ,अभ्यास करून ,पुढे जावे लागेल .आज अभ्यासक्रमाचे काम बाजूला राहिले .पाटी-पेन्सिल आपली मात्र त्यांची सरस्वती, शारदा पुढे आणली गेली आणि निखळ सत्य पुढे आणून मांडण्याचे काम केले .मात्र यांची उपेक्षा झाली असे म्हणणे हे आपला कमीपणा सांगत असल्याचे लक्षण आहे.

इतिहास जो घडला ते पुढे आणले गेले नाही सर्वांगीण परिवर्तनाचा विचार पुढे आणला गेला पाहिजे आणि संविधान वाचण्याची चळवळ जी सत्यशोधक चळवळीने याबाबत उडी घेतली तो मोठा आधार असेल .मतभेद झालेतर तेही स्पष्ट असावेत . आज राजनीति ची चमत्कारिक कथा पाहायला मिळत आहे. एक दिवस शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होते, तर दुसर्‍या दिवशी चपलांचे हार बंगल्यावर पडतात .करोना पेक्षाही भयानक अवस्था असून भारत अपेक्षित संविधानामध्ये घडवायचा असेल तर त्यासाठी या चळवळीचा आधार घेत आपल्याला पुढे जावे लागेल असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले .या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ .निशिगंधा चव्हाण यांनी केले.
या कार्यक्रमास सुनील शिंदे, श्री .आदलिंगे ,लक्ष्मीकांत रांजणे, प्राचार्य शरच्चंद्र चव्हाण, दत्ता काळेबेरे ,बाबासाहेब तांबोळी ,अरुण खोरे यांच्यासह चव्हाण परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!