दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२३ । बंगळुरू । आगामी २०२४ च्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी आज विरोधी पक्षांची बंगळुरूत बैठक पार पडली. बिहारची राजधानी पाटणा येथे पहिली बैठक झाल्यानंतर आजच्या बैठकीकडे देशाचे लक्ष लागले होते. तर पुढची तिसरी बैठक मुंबईत होणार असून तेव्हा आघाडीचा चेहरा ठरवला जाईल, असे कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. आज झालेल्या बैठकीत विरोधकांच्या महाआघाडीच्या नावावर चर्चा झाली असून ‘INDIA’ या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलताना ‘ही लढाई तानाशाही विरोधात’ असल्याचे म्हटले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आज दुसरी यशस्वी बैठक झाली असून तानाशाहीविरूद्ध जनता एकत्र आली आहे. आघाडीचे नाव जाहीर झाले आहे. ‘इंडिया’ ज्याच्यासाठी आपण लढत आहोत आणि त्यासाठीच एकत्र आलो आहोत. राजकारणात वेगवेगळी विचारधारा असते आणि ते गरजेचे देखील आहे. पण, तरीदेखील आपण एकत्र आलो आहोत. काही लोकांना वाटते की आम्ही कुटुंबासाठी एकत्र आलोय. मी त्यांना सांगेन की, होय, हा देश आमचे कुटुंब असून त्याला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची लढाई एका व्यक्तीविरूद्ध किंवा एका पक्षाविरूद्ध नाही तर एका विचारसरणीविरूद्ध आहे. एकेकाळी ज्याप्रकारे स्वातंत्र्याची लढाई झाली. आज ते स्वातंत्र्य धोक्यात आले असून त्यासाठी आमची एकजुट आहे. मला विश्वास आहे की यात आम्ही यशस्वी होऊ. देशाच्या जनतेला मी सांगू इच्छितो की, ‘हम है ना’ घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत.
अरविंद केजरीवालांचा घणाघात
“मागील ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप काही करू शकले असते पण त्यांनी सर्वच क्षेत्रांना उद्ध्वस्त केले. आम्ही इथे स्वतःसाठी नाही तर देशाला द्वेषापासून वाचवण्यासाठी जमलो आहोत”, अशा शब्दांत आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.