
दैनिक स्थैर्य । दि. 17 जुलै 2025 । फलटण । फलटण तालुक्यातील रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येत वाटचाल करणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळामध्ये आमच्या अर्थात खर्डेकर कुटुंबातील एकमेव सदस्य हा राजकारणामध्ये पद घेतलेला असेल. आम्ही सर्व पदे स्वतःच्या घरी घेत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा विविध पदे देऊन त्यांना ताकद देण्याचे काम दादाराजेंपासून आमचे घर करीत आहोत. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकतीने उभा राहण्याचे काम करणार असल्याची ग्वाही युवा नेते श्रीमंत धिरेंद्रराजे खर्डेकर यांनी केले.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने वाटचालीबाबत दैनिक “स्थैर्य” सोबत श्रीमंत धिरेंद्रराजे खर्डेकर बोलत होते.
यावेळी बोलताना खर्डेकर म्हणाले की, आम्ही कोणत्या घरातील आहोत किंवा कोणत्या गावातील आहोत, हे तालुक्याला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब यांच्या भावाच्या घरामधील आमचे घर आहे. आम्ही सुद्धा निंबाळकर असून आमचे पूर्वज लढाईच्या वेळी बाहेर गेले होते, हा इतिहास जाणीवपूर्वक ते विसरले आहेत कि काय ? का सोयीप्रमाणे इतिहासाचा वापर करायची त्यांची सवय आहे कि काय ? असा टोला सुद्धा यावेळी श्रीमंत धिरेंद्रराजे यांनी लगावला आहे.
राजकारणामध्ये व समाजकारणामध्ये कामकाज करत असताना आपल्या फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसामान्य युवकांनी पुढे येऊन काम करणे अत्यंत गरजेचे आहे. युवक हा राजकारणाचा पाया असून त्यांनी राजकारणामध्ये सक्रिय कामकाज करणे अतिशय आवश्यक असल्याचे सुद्धा नमूद करत येणाऱ्या काळामध्ये फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मत श्रीमंत धिरेंद्रराजे खर्डेकर यांनी यावेळी व्यक्त केले.