
आज संपूर्ण जगात कोरोनामुळे अनेक बदल झाले. बदल हा निसर्गनियमच आहे. माझ्या वयाच्या पिढीने वेळोवेळी होणारी स्थिंत्यतरे याची देही याची डोळा पाहिली. मोबाईलच्या माध्यमातून जगच प्रत्येकाच्या हातात आले आहे. क्षणाक्षणाची घडामोड प्रत्येकाला आता लगेच समजते आहे.
आज सोशलमिडिया,रंगीत टि.व्ही. हे सरसकट सर्वत्र पहावयास मिळते. जे पाहिजे ते ज्ञान इंटरनेटच्या माध्यमातून उपल्बध होते आहे. त्याकाळी रेडिओ हे करमणुकीचे व माहितीचे प्रमुख साधन होते. श्रीमंतांपासून गरिबाच्या झोपडीपर्यंत रेडिओ असायचे. सकाळी सकाळी बहुतेक घरातून ‘इयं आकाशवाणी, संप्रति वार्ताः श्रुयंताम्। प्रवाचकः श्’ या वाक्यांनी सुरू होणार्या संस्कृत बातम्या आकाशवाणी ऐकलेल्या जुन्या श्रोत्यांच्या लक्षात आजही असतील. तेव्हा जगभरासहित देशातील व राज्यातील घडामोडींची माहिती रेडिओच्या बातम्यांतूनच समजायची. करमणुकीच्या कार्यक्रमांत कामगार विश्व,चित्रपट संगीत आणि रेडिओ सिलोनवर सुप्रसिध्द निवेदक अमिन सयानी यांची बिनाका गितमाला आदी कार्यक्रम लोकप्रिय होते. हे कार्यक्रम आत्तासारखे दिवसरात्र नव्हते तर ठराविक वेळीच प्रसिध्द व्हायचे. श्रोत्यांची त्याला अमाप पसंती होती. नंतर दूरदर्शन केंद्राची स्थापना होऊन कृष्णधवल (फक्त काळा व पांढरा या दोनच रंगात दिसणारा) दूरदर्शन संच टि.व्ही. आला. त्यावर सुध्दा ठराविक वेळातच कार्यक्रम असायचे. सायंकाळी 7 वाजता मराठी बातम्या, आमची माती आमची माणसं, फक्त शनिवारी मराठी चित्रपट व रविवारी हिंदी चित्रपट तसेच बुधवारी व रविवारी चित्रहार,रंगोली आदी कार्यक्रमातून मनोरंजन होत होते. दूरदर्शन हि एकच वाहिनी होती. त्याला आत्तासारखे पर्याय नसल्याने त्यावर प्रसारित होतील तेच कार्यक्रम पाहणे भाग होते. रात्री साडेआठ नंतर दिल्ली दूरदर्शनचे कार्यक्रम सुरु व्हायचे. याशिवाय करमणूकीसाठी शहरातच चित्रपटगृह होती. काही मोठ्या गावात त्याकाळी चित्रपटांचे तंबू यायचे. आज पूर्ण नामशेष झालेली सर्कस,जादूचे प्रयोग,आदी कार्यक्रम असायचे. गावोगावच्या जत्रांमध्ये चित्रपटांचे तंबू व होणारा तमाशा ही करमणूकीची प्रमुख आकर्षणे असायची. खेड्यांत ग्रामपंचायत व शहरात नगरपालिकेचा सार्वजनिक टि.व्ही. असायचा. तो ठराविक काळात सुरु व्हायचा. त्यावर कार्यक्रम पाहण्यासाठी झूंबड उडायची.
नंतर हळूहळू अनेक सुखवस्तू घरांत टि.व्हि.संच आले. आप्तस्वकियांची ख्याली खुशाली समजण्याचे पोस्टखाते हे एकमेव साधन होते. टेलिफोन हे ठराविकांपुरतेच मर्यादित होते. सर्वसामान्य पोस्टकार्ड,आंतरदेशीय पत्रे, आणि पाकिटे या पोस्टखात्याच्या सेवेतून आप्तस्वकियांच्या संपर्कात होता. जास्तच तातडीचे असेल तर पोस्टखात्याची तार ही सेवा होती. पण तार आली म्हटले की घरातील जेष्ठ हादरायचे कारण बहुतेक आप्तस्वकियांच्या मृत्यूच्या बातम्या तारेच्याच माध्यमातून समजायच्या. किंवा एका बाजूला कोरे असलेले पोस्टकार्ड आले की, समजायचे कोणीतरी देवाघरी गेले. नंतर हळूहळू जुन्या काळातील फोनचा प्रसार झाला. परंतु हि सेवा ठराविकांनाच परवडणारी होती आणि त्यात लाईन बिझी म्हणजेच फोन न लागणे हा प्रकार होता. त्यानंतर एस.टी.डी. फोन सेवा सुरु झाली. ठिकठिकाणी हि केेंदे सुरु झाली. पण माणूस होणार्या बिलाच्या पैशाकडे लक्ष ठेवून मोजक्याच शब्दांत निरोपांची देवाणघेवाण करत होते. नंतरमात्र पेजर, साधा मोबाईल या सेवा सुरु झाल्या पण या सेवांचा वापर हेच प्रतिष्ठेचे लक्षण होते. घरी फोन असणे, हातात मोबाईल असणे, घरात टि.व्हि. असणे इे ठराविकांनाच परवडणारे होते. सर्वसामान्य गरजेच्यावेळीच याकडे पहात होता तर श्रीमंतांची हि चैन होती. प्रतिष्ठेची लक्षणे होती. वाहतुकीच्या साधनात बैलगाडी हे प्रमुख साधन होते. खेडयापाड्यात आजारी पडणार्यांसाठी बैलगाडी हि तत्कालिन रुग्णवाहिकाच होती. सायकल मात्र सर्वत्र होत्या. ती त्याकाळची कामगारवर्गाची गरजच होती. शेतकऱ्यांसाठी सहकार हि समृध्दी होती. मोठ्या बागायतदाराकडे ट्रॅक्टर, महिंद्रा जीप, अँबेसिडर अशी वाहने असायची. कधीतरी प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी मात्र एस.टी. हेच प्रमुख साधन होते. पण नंतर जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. माजी पंतप्रधान राजीवगांधी हे वैमानिक म्हणून सेवा बजावत होते. त्यांनी जग पाहिले होते. माझा देश असा प्रगत व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. सॅम यांची 1987 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लगार म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1989 मध्ये भारतीय दूरसंचार आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. दूरसंचारविषयक कायदेकानून आणि त्यांचा सर्वांगीण विकास या सर्व गोष्टींची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. भारताचे राष्ट्रीय दूरसंचार धोरण ठरविण्यात पित्रोदा यांचे मोठे योगदान आहे. भारताच्या दूरसंचार क्रांतीचे शिल्पकार म्हणूनच ते ओळखले जातात विशेषतः त्यांच्यामुळेच सर्वव्यापक पीतवर्णी सार्वजनिक दूरध्वनी सेवाकेंद्राच्या रूपात सबंध भारतात स्वस्त आणि सुलभ अंतर्गत विदेश दूरध्वनिसेवा उपलब्ध झाली. सी-डॉट प्रत्यक्षात अवतरल्यावर पित्रोदांनी भारतात लहान, ग्रामीण दूरध्वनी कार्यालये उभारली त्याचप्रमाणे जगातील अनेक दुर्गम प्रदेशांमध्ये दूरध्वनींचे जाळे पसरविले. या दूरध्वनी जाळ्याच्या उभारणीमागील मूलभूत तंत्रज्ञान हे अतिशय साधे व स्वस्त होते. सी-डॉट यंत्रणेतील पित्रोदांच्या गटाने शोधून काढलेल्या एका उपकरणाच्या योगे दूरध्वनी करणार्याला येणार्या खर्चाचे आकलन होई, तसेच दूरध्वनी वापरणाऱ्याला दूरध्वनी केल्याचे पैसे दूरध्वनि केंद्राऐवजी तात्काळ कळत असत यामुळे भारतीय दूरध्वनियंत्रणेत मोठा बदल घडून आला. भारतातील दूरसंचारयंत्रणेत क्रांती आणण्याबरोबरच पित्रोदांनी इतर विकसनशील अर्थव्यवस्थांसमोर भारताच्या रुपायाने एक आदर्श निर्माण केला. याचबरोबर पित्रोदांनी पन्नासांवर एकस्वे मिळविली. उदा., डिजिटल स्विचिंग, सिंकोनायझेशन, सुयोग्य ध्वनिनिर्मिती (टोन जनरेशन), सुयोग्य ध्वनिगहण, मोठमोठ्या सभांचे आयोजन तसेच वाणिज्य विषयक दहा एकस्वे. सध्या सॅम पित्रोदा इलेक्ट्रॉनिकीय वॉलेटविषयक (इलेक्ट्रॉनिकीय पैशाचे पाकीट) एकस्व मिळविण्यासंबंधी कार्यरत आहेत. या वॉलेटमध्ये पतपत्र (केडिटकार्ड), नावेपत्र (डेबिटकार्ड), आरोग्यपत्र (हेल्थकार्ड), विमापत्र (इन्शुरन्सकार्ड), वाहनपरवानापत्र इ. प्रकारची कार्डे उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिकीय पद्घतीने सरकारी नोकरांचे पगार थेट बँकांध्ये त्या त्या कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा होऊ लागले. तसेच वीज बिले, दूरध्वनी बिले इ. जमा होऊ लागली. याचे श्रेय पित्रोदांकडे जाते. पित्रोदा यांच्या ‘सी-डॉट’चे महत्त्वाचे योगदान म्हणजे रॅक्स (रुरल ऑटोमॅटिक एक्स्चेंज) आकाराने लहान, स्वस्त परंतु मजबूत स्विच ज्यांच्या योगे दूरध्वनियंत्रणा ग्रामीण भागात रुजली गेली व तिने दूरसंचारण व्यवस्थेचा पाया घातला. आजकाल सर्व जागतिक घडामोडी प्रत्येकाला आपल्या हातातील मोबाईल संचावर समजू शकतात ते केवळ यामुळेच. दुर्दैवाने राजीव गांधीची हत्या झाली. नंतर नरसिंह राव हे पंतप्रधान झाले.
त्याकाळी भारताची अर्थव्यवस्था कमकुवत होती. जेव्हा नरसिंह राव पंतप्रधानपदावर विराजमान झाले, तेव्हा ते बर्याच विषयात तज्ज्ञ झाले होते. आरोग्य आणि शिक्षण मंत्रालय त्यांनी आधीच सांभाळलं होतं. भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. पण अर्थ खात्यात त्यांना विशेष गती नव्हती. राव यांना असा एक मुखवटा हवा होता, जो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि पक्षांतर्गत विरोधकांना हे पटवून देईल, की भारत आता जुन्या अर्थधोरणानं तगणार नाही. मनमोहन सिंग यांना स्वत: नरसिंह राव यांनी फोन केला. राव यांनी मनमोहन यांना अर्थमंत्रीपदाची ऑफर दिली.आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पीय भाषणाला डॉ. मनमोहन सिंग यांनी ज्या विचारांची वेळ आली आहे, त्याला जगातली कुठलीही ताकद रोखू शकत नाही, या व्हिक्टर ह्यूगोच्या ओळींनी सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी वारंवार राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि नेहरुंचा उल्लेख केला. पण त्यांच्या आर्थिक धोरणांच्या बरोबर उलट पावलं उचलण्यात डॉ. मनमोहन सिंग यांनी कधीच हयगय केली नाही. 1991 मध्ये सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून परवाना राजातून भारताची मुक्तता केली. हे दशकांपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेतील मंद आर्थिक वाढ आणि भ्रष्टाचाराचे स्रोत होते. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला उदारीकरण केले आणि यामुळे नाटकीय विकासाला वेग मिळाला. त्या अर्थसंकल्पानंतर अनेक बदल झाले. नरसिंह राव यांनी अनेक नवख्या मंडळींना सोबत घेऊन देशाच्या अर्थकारणात जे बदल घडवले त्याला तोड नाही..प्रतिकूल परिस्थिती असतानाही राव यांनी आपल्या कारकीर्दीच्या पहिल्याच वर्षांत मोठया सुधारणा यशस्वीपणे रेटून नेल्या. वाजपेयी यांनीदेखील तेच केले. भारतीय अर्थकारणात इतिहास घडला. 4 जुलै 1991 या दिवशी, तत्कालीन वाणिज्यमंत्री पलानिअप्पन चिदम्बरम यांनी आपले पहिले व्यापार धोरण सादर केले आणि आयातीवरील मागास र्निबध एका झटक्यात उठवले. हे र्निबध किती मागास होते? तर त्या काळी आपल्या सरकारच्या लेखी संगणक हे यंत्र नव्हते आणि सॉफ्टवेअर हे उत्पादन असू शकते ही कल्पनादेखील सरकारी यंत्रणांना पचत नव्हती. संगणकात काहीही फिरते भाग नाहीत, तेव्हा त्यास यंत्र का म्हणावे असा आपल्या सरकारचा सवाल होता आणि त्याचे उत्तर त्याच्या लेखी नाहीच असे होते. परिणामी संगणकाच्या मूळ किमतीवर प्रचंड कर आकारला जात असे. राजीव गांधी यांच्या कारकीर्दीत यात सुधारणा होण्यास सुरुवात झाली खरी. परंतु त्या पुरेशा नव्हत्या. त्यामुळे त्यांना मुळापासून उखडून टाकणेच आवश्यक होते. परमिट किंवा लायसन्सराज या नावाने ओळखल्या जाणार्या त्याआधीच्या काळात परिस्थिती इतकी वाईट होती की साधे हॉटेलच्या खोल्यांचे भाडे जरी संबंधित कंपनीस वाढवावयाचे असेल तर केंद्र सरकारची अनुमती घ्यावी लागे आणि त्यासाठी दिल्लीला हेलपाटे मारावे लागत. त्या काळी मनगटावरचे घडयाळ हेदेखील स्वप्न होते आणि त्याच्या पूर्ततेसाठी महिनोन्महिन्यांची वाट पाहावी लागत असे. घडयाळाची आगाऊ मागणी नोंदवावी लागत असे आणि तिच्या पूर्ततेत काही महिने जात. जेआरडी टाटा, झेरेक्स देसाई आदी उद्योगपतींनी त्या वेळच्या काळाचे केलेले वर्णन आपल्या मागासतेचा पुरावा आहे. तेव्हा या मागासपणास मूठमाती देणे ही काळाची गरज होती. ती पहिल्यांदा ओळखली ती नरसिंह राव यांनी. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर आलेले पंतप्रधानपद, सोने गहाण टाकायची आलेली वेळ आणि त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे पुरेसे राजकीय पाठबळदेखील नाही. अशा काळात राव यांनी जे साध्य केले ते अनेकांना प्रबळ राजकीय पाठबळ असूनही आजतागायत जमलेले नाही. राव यांनी सुधारणांचा धडाका लावला 4 जुलैस चिदम्बरम यांनी व्यापार धोरण सादर करण्याआधी एक दिवस राव यांनी सरकारने रुपयाचे दुसरे अवमूल्यन केले. हा दुसरा धक्का. पहिला त्यांनी 1 जुलैस दिला होता. त्या दिवशी रुपयाचे पहिले अवमूल्यन झाले. दोन दिवसांनी दुसरे. 4 जुलैस आयात खुली करणारे धोरण सादर झाले आणि 24 जुलै रोजी तो ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर झाला. राजकीय क्षेत्रात काहीही ओळख नसलेल्या मनमोहन सिंगनामक अर्थतज्ज्ञाकडून राव यांनी हे काम घडवून आणले. आज आथक सुधारणांचे पुण्य सिंग यांच्या खाती जमा आहे. पण ते व्हावे यासाठीचा निर्णायक वाटा हा राव यांचा आहे, हे विसरता नये. 24 जुलैस सिंग यांनी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्याआधी त्याच दिवशी दुपारी पंतप्रधान राव यांनी औद्योगिक धोरणाचा नवा मसुदा संसदेच्या पटलावर सादर केला. त्याद्वारे तोपर्यंत फोफावलेल्या परमिटराज पद्धतीस मूठमाती देण्यात आली. त्यानंतर काही तासांतच सिंग यांनी आपला अर्थसंकल्प सादर केला आणि आथक उदारीकरणाचे वारे पहिल्यांदा भारतभूमीवर वाहू लागले. वास्तविक त्यात त्या दिवशी सादर करण्यात आलेल्या औद्योगिक धोरणाचा वाटा मोठा आहे. परंतु पंतप्रधान राव यांनी ते अशा पद्धतीने सादर केले की आजही अनेकांना या सार्या सुधारणा सिंग यांच्या अर्थसंकल्पाचा भाग वाटतात. हे राव यांचे मोठेपण. आणि राजकीय चातुर्यदेखील. मोठेपण यासाठी की अनेक अपरिचितांना हाताशी घेत राव यांनी हा सुधारणांचा डोंगर लीलया पेलला. माँटेकसिंग अहलुवालिया वा करसुधारणा करणारे राजा चेलय्या आदी मान्यवर हे त्या वेळी सरकारात नवखे होते. तीच बाब मनमोहन सिंग यांचीही. अशा सर्वाना हाताशी धरत राव यांनी जे काम केले त्यास आधुनिक भारताच्या इतिहासात तोड नाही. आजही यातील उत्तमोत्तम निर्णयांचे श्रेय हे त्या त्या मंडळींना दिले जाते. परंतु त्यामागे राव यांच्यासारखा धुरंधर पंतप्रधान होता, हे विसरता येणार नाही. याचे कारण आर्थिक सुधारणा ही कल्पना देशालाच काय खुद्द त्यांच्या काँग्रेस पक्षालादेखील नवीन होती. सुधारणांमध्ये सरकारने आपल्या हातील अधिकार कमी करीत जाणे अपेक्षित असते. आजच्या राजकीय काळातही ही बाब मान्य होत नाही. तेव्हा राव यांना किती मोठया विरोधास तोंड द्यावे लागले असेल याची कल्पनाच केलेली बरी. सोनिया गांधी आणि काँग्रेसमधील एकापेक्षा एक बनेल ढुढ्ढाचार्य आणि हाताशी नसलेले बहुमत हे दोन्ही सांभाळत राव यांनी या सुधारणा रेटल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची दखल घेतली जाण्यास सुरुवात झाली ती तेव्हापासून. आज जागतिक पातळीवर भारतीय पंतप्रधानांना ऐकण्यास देशोदेशीच्या बाजारपेठा उत्सुक असतात त्यामागे केवळ राव आणि राव यांची पुण्याई आहे, याचे भान नसणे कृतघ्नपणाचे ठरेल. पुढे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने यातील काही सुधारणा अधिक पुढे नेल्या. या आपल्या पूर्वसुरींनी जे करून ठेवले त्याचे स्मरण आणखी एक मुद्दा अधोरेखित करते. ते म्हणजे या मंडळींनी त्यास घेतलेला वेळ. राजीव गांधी यांची हत्या 1991 सालच्या मे महिन्यात झाली आणि सत्तेची सूत्रे राव यांच्याकडे आली. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत राव यांनी मृतवत भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणांचे प्राण फुंकले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही राव यांनी आपल्या कारकीर्दीच्या पहिल्याच वर्षांत मोठया सुधारणा यशस्वीपणे रेटून नेल्या. वाजपेयी यांनीदेखील तेच केले. हे भारतीय पंतप्रधान असोत वा महातीर मोहंमद यांच्यासारखे मलेशियाचे सुधारणावादी नेते असोत. या सर्वानी जे काही मोलाचे काम केले ते सर्व पहिल्याच वर्षांत. ज्यास मधुचंद्राचा काळ म्हणतात त्या काळात. याचे कारण निवडून आल्यानंतर संबंधित जननेत्यासाठी साधारण वर्षभराचा काळ असा असतो की त्या काळात त्याने काहीही केले तरी ते गोड मानून घेतले जाते. म्हणूनच धूर्त आणि चतुर राजकारणी या मधुचंद्राच्या कालखंडात दूरगामी धोरणात्मक निर्णय घेऊन टाकतात. हे चटके पुढे खुद्द मनमोहन सिंग यांनीही अनुभवले. 1991 साली अर्थमंत्री म्हणून सिंग जे काही करू शकले त्याच्या एकचतुर्थाशदेखील 2004 साली थेट सर्वोच्च अशा पंतप्रधानपदी निवड झाल्यावर आणि दहा वर्षे या पदावरून देशाचे नेतृत्व करताना सिंग यांना साध्य करता आले नाही. हीच खंत त्यांनी अलीकडे ‘इंडियन एक्स्प्रेस’ शी बोलताना व्यक्त केली. “संकट आले तरच आपण उत्तम कार्य करून दाखवतो, ते गेले की आपला कारभार पुन्हा ये रे माझ्या मागल्या..” अशा शब्दांत सिंग यांची वेदना व्यक्त झाली. पंतप्रधान म्हणून ती वेदना त्यांनीही अनुभवली आणि समस्त भारतीय नागरिक आताही ती अनुभवत आहेत. खरे तर 1991 साली या वेदनामुक्तीचा मार्ग राव आणि सिंग यांनी दाखवून दिला होता.
हे सर्व उदाहरणांसह संकलन मांडणी एवढ्याचसाठी की, आमच्या काळतच आपल्या देशात परकीय चलन उपलब्ध करण्यासाठी जागतिक बँकेत सोने गहाण टाकण्याची वेळ आली होती. पण अभूतपूूर्व आर्थिक सुधारणांमुळे आपण आपली अर्थव्यवस्था दृढ बनवू शकलो आहोत. आणि केवळ त्यामुळेच आत्ताची पिढी सहजरित्या चैनचंगळ करु शकते आहे. साधी सायकल खरेदी करण्यास दुरापास्त असलेल्या मध्यमवर्गीयांकडे आज बहुतांश वाहने आहेत. आजची तरुणपिढी त्याचा स्वैर वापर करत आहे परंतु या परिस्थिती बदलासाठी धुरंधर अर्थव्यवस्था बदलाचे योगदान देणारी मंडळी आपल्याला लाभली आहे याची जाणिव ठेवणे गरजेचे आहे कारण आज सगळे जग कोरोनाने ठप्प झाले असताना आपण अजून ताठ मानेने उभे आहोत. आणि त्यासाठीच हे स्थित्यंतर लक्षात ठेवणे आवश्यक आहे. दुष्काळ आणि सुकाळ यातील प्रवास किती कठीण होता पण आपल्या योग्यतापूर्ण बुध्दीवाद्यांनी आपल्या बुध्दीप्रामाण्यावर या सुधारणा घडवून आणल्या आहेत. आता या नविन संकटामुळे हा भूतकाळ ओळखून येणार्या संधी साधणे गरजेचे आहे. नुकतीच आजच बातमी आली आहे की, कार्टून पाहू दिले नाही म्हणून एका किशोरवयीन मुलाने आपले जीवन संपवले आहे. अशा वेदनादायी घटना सतत सध्या घडत आहेत. गाडी,मोबाईल पालक देत नाहीत म्हणूनही काही तरुण तरुणी आत्महत्या करत आहेत. हे टाळण्यासाठी पालकांनीच त्यांना विश्वासात घेऊन अशा लेखांचा संदर्भ समजावून भविष्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण भल्या भल्या महाशक्ती हतबल झाल्या असताना आपणच आपली तरुण पिढी सक्षम ठेवून चैनीच्या वेळी चैनचंगळ आणि सुदृढ भविष्यासाठी कष्टाची सवय लावणे आवश्यक आहे.
वरील लेखासाठी इंटरनेटवरुन संदर्भ उपल्ब्ध करुन मिळविले आहेत.