स्थैर्य, मुंबई, दि.२७: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अखेर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुप्त भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही वैयक्तिक शत्रू नाही, फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती, तर ‘सामना’साठी मुलाखत घेण्याबाबत चर्चा झाली, असे राऊत यांनी सांगितले.
फडणवीसांची जाहीरपणे मुलाखत घेण्याचा विचार होता
राऊत म्हणाले की, ”देवेंद्र फडणीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्यांना भेटणे हे काही गुप्तपणे नव्हते. ही काही बंकरमध्ये भेट नव्हती. त्यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. त्यांची जाहीरपणे मुलाखत घेण्याचा विचार होता. महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यविषयक संस्थांचीही इच्छा आहे, की मी संपादक म्हणून फडणवीसांची जाहीर मुलाखत करावी.”
देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाही
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काही आमचे शत्रू नाही. भाजपसोबत असतानाही मी शरद पवारांशी बोलायचो. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. उद्धव ठाकरे आणि मी सुद्धा त्यांना आपला नेता मानतो’, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.
या भेटीतून कोणतेही समिकरण तयार होणार नाही
राज्य सरकारचा व्यवस्थिती कारभार सुरू आहे. पाच वर्ष हे सरकार चालणार आहे. राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे योग्य प्रकारे सांभाळत आहेत. शरद पवार त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे या भेटीतून कोणतेही समिकरण तयार होणार नाही, असे म्हणत सरकार पडण्याची शक्यता संजय राऊत यांनी फेटाळून लावली.
‘भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार नाही. चर्चा करायची असले तर ती होऊ शकते. आपल्याकडे चर्चेला काही सेन्सारशिप नाही. पण चर्चेला रेशनिंग सुद्धा नाही, असेही राऊत म्हणाले.