स्थैर्य, फलटण, दि. १७: संपूर्ण फलटण तालुक्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वेगाने होत असताना वाठार निंबाळकर गावातही एक महिन्यापूर्वी 114 रुग्ण सक्रीय होते. या ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षाच्या माध्यमातून योग्य उपचार व खबरदारीमुळे एका महिन्यात ही रुग्णसंख्या 4 वर आली असून गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या आवाहनानंतर ग्रामस्थांच्या पुढाकारातून गावात कोरोना विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली होती. या विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनाप्रसंगी श्रीमंत संजीवराजे यांनी सर्वतोपरी दक्षता घेण्याच्या सूचना सर्वांना केल्या होत्या. त्यानुसार वाठार निंबाळकर येथे लोकसहभागातून सुरू झालेल्या विलगीकरण कक्षासाठी वाठार निंबाळकर गावचे सुपुत्र सत्यजित नाईक-निंबाळकर यांचे संकल्पनेतून व आर्थिक मदतीतून तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील लोक सहभागातून अतिशय चांगल्या प्रकारे 45 बेड चे विलीनीकरण कक्ष कार्यान्वीत झाले. या कक्षासाठी गावातील सर्व दानशूर व्यक्तीकडून चांगल्या प्रकारचे सहकार्य मिळाले. गावातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी सुमारे 75 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व विलीनीकरण कक्षातील सर्व रुग्णांना दोन वेळेस शाकाहारी व मांसाहारी जेवणाची सोय केली. तसेच सकाळी नाश्त्यासाठी अंडी व संध्याकाळी फळे याची व्यवस्था केली.
गावातील तरूण कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी स्वच्छतेची सर्व जबाबदारी घेऊन स्वखर्चातून त्या ठिकाणी सफाई कामगार व कंपाउंडर यांची नेमणूक केली. सदर विलगीकरण कक्षासाठी गावातील डॉ.रवींद्र बिचुकले, डॉ. नेताजी निंबाळकर, डॉ. अनिकेत जगदाळे तसेच गिरवी आरोग्य केंद्राचे डॉ. राठोड, सर्व आरोग्यसेविका यांनी नियमित रुग्णांना तपासणी केल्यामुळे रुग्ण लवकरच बरे झाले.
याच एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून गाव आज कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून याबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.