
स्थैर्य, महाबळेश्वर, दि. 9 : महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बरसणार्या धुवाँधार पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी व नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णालेक तलाव तुडुंब भरला असून बुधवारी सायंकाळी सांडव्यावरून पाणी वाहू लागले. प्रथेप्रमाणे महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली कुमार शिंदे, नूतन मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील यांच्या हस्ते व पालिका नगरसेवकांच्या उपस्थितीत वेण्णामाईचे जलपूजन करून परडी सोडण्यात आली.
जून महिन्याच्या प्रारंभी निसर्ग चक्रीवादळाने शहर व परिसराला अक्षरशः झोडपून काढले होते. तदनंतर मात्र काही दिवस ब्रेक घेतलेल्या पावसाने जून महिन्याच्या उत्तरार्धात, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने धुवाँधार बॅटिंग केली. या पावसाने पर्यटकांच्या आकर्षणाचे नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या व महाबळेश्वरकरांसाठी जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेले वेण्णालेक (वेण्णा तलाव) बुधवारी सायंकाळी दुथडी भरून वाहू लागला असून प्रथेप्रमाणे महाबळेश्वराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे, सौ. पल्लवी भोरे-पाटील यांच्या हस्ते, नगरसेवक कुमार शिंदे, स्नेहल जंगम, आफ्रीन वारुणकर, संदीप आखाडे, यशवंत भोरे, पालिकेचे आबाजी ढोबळे, शरद मस्के आदींच्या उपस्थितीत वेण्णामाईचे जलपूजन करून पारंपरिक पद्धतीने ओटी भरून परडी सोडण्यात आली.
सध्या पावसाळी हंगामास प्रारंभ झाला असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेण्णातलाव व परिसरात शुकशुकाटच आहे. हौशी स्थानिक मात्र या ठिकाणी भेट देऊन निसर्गसौंदर्याची मजा लुटत आहेत. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेला हा वेण्णालेक परिसर धुक्यात हरविला आहे. जोरदार वारा व पाऊस असल्याने वेण्णालेक वरील बोटी विसावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोसळणार्या पावसाने वेण्णालेकच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून महाबळेश्वर व परिसर हिरवाईने नटला आहे. मागील वर्षी 5 जुलै रोजी वेण्णा तलाव दुथडी भरून वाहू लागला होता.