
स्थैर्य, कोळकी, दि. १ ऑक्टोबर : येथील ग्रामस्थांच्या मागणीनंतर आमदार सचिन पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार निरा उजवा कालव्यातून गावासाठी पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेला गावाचा पाणीपुरवठा आता सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
निरा उजवा कालव्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे सुमारे ३० हजार लोकसंख्या असलेल्या कोळकी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत होते. या समस्येबाबत प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनी व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सचिन पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
आमदार पाटील यांनी तातडीने जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता मोरे यांना संपर्क करून पाणीपुरवठा करणारी टाकी भरण्यासाठी कालव्यातून पाणी सोडण्याचे निर्देश दिले. या निर्देशानंतर पाणीपुरवठा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार पाटील यांचे आभार मानले आहेत.

