
स्थैर्य, फलटण, दि. 27 सप्टेंबर : कोळकी (ता. फलटण) येथील पाणीपुरवठा गेल्या पाच-सहा दिवसांपासून विस्कळीत झाला असून, ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट ओढवले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे, अशी आग्रही मागणी कोळकीचे माजी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह रणजितसिंह निंबाळकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
कोळकी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना दिलेल्या निवेदनात, उदयसिंह निंबाळकर यांनी म्हटले आहे की, सध्या गावातील केवळ चार ते पाच ठिकाणीच पाणीपुरवठा होत आहे. उर्वरित भागातील नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत.
धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा असूनही, कॅनॉलच्या दुरुस्तीच्या कामामुळे शहर आणि उपनगरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती पाहता, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच आष्टागर रस्त्यावरील फिल्टर हाऊस येथे २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे.