
स्थैर्य, फलटण, दि. २९ ऑगस्ट : नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा ९९.२० टक्क्यांवर स्थिर असून, परिसरातील पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे. भाटघर धरण शंभर टक्के क्षमतेने भरले असून, वीर, नीरा देवघर आणि गुणवडी ही धरणेही काठोकाठ भरलेली आहेत. आजमितीला चारही धरणांमध्ये मिळून एकूण ४७.९९ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे, जो गतवर्षीच्या तुलनेतही किंचित जास्त आहे.
नीरा उजवा कालवा विभागाने आज प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भाटघर धरण १०० टक्के भरले आहे. तर, नीरा देवघर ९९.३२ टक्के, वीर ९८.९४ टक्के आणि गुणवडी धरण ९५.६६ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सुरू असल्याने धरणांमधील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून योग्य नियोजन केले जात आहे.
सध्या वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात २,३५० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. यासोबतच, सिंचनासाठी नीरा उजवा आणि डाव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात येत असल्याने शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे.
सदर माहिती फलटण येथील नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता सं. रा. बोडाखे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मुबलक पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामाला मोठा आधार मिळणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.