दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२२ । औरंगाबाद । मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांतील जलसाठा ६७.१३ टक्क्यांवर पोचला आहे. सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीमधील उपयुक्त पाणीसाठा सोमवारी (ता. १८) रात्री दहापर्यंत ७५.१० टक्क्यांवर पोचला होता. या धरणात ३३ हजार ६२० क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील मनार प्रकल्प शंभर टक्के भरला आहे.
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा १८ जुलै अखेर ६७.१३ टक्क्यांवर पोचला आहे. गेल्यावर्षी याच दिवसापर्यंत हा उपयुक्त पाणीसाठा ४६.६१ टक्के होता. गेल्या पंधरा दिवसांपासून अहमदनगर, नाशिक भागात होत असलेल्या पावसामुळे व तेथील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने जायकवाडीतील जलसाठ्यात वाढ होत आहे. १० जुलैअखेर जायकवाडीतील उपयुक्त जलसाठा ३४ टक्के होता. आता सुमारे ३९ ते ४० टक्क्यांनी जलसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी १८ जुलै अखेर जायकवाडी धरणात ३५.४९ टक्के उपयुक्त पाणी साठा होता. यंदा याच दिवशी सायंकाळी सहापर्यंत ७४.६० टक्के साठा झाला आहे.
मध्यम प्रकल्पांची स्थिती
नांदेडमधील ९ व औरंगाबादमधील दोन अशा अकरा मध्यम प्रकल्पांत ७५.४६ टक्के उपयुक्त पाणी साठा झाला आहे. १६२ लघू प्रकल्पांत ५६.३८ टक्के साठा झाला आहे. गोदावरी नदीवरील अंतेश्वर, आमदुरा, बळेगाव, बाभळी येथील बंधाऱ्यांत ४५.५० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली.
प्रकल्पनिहाय जलसाठा (आकडे टक्क्यांत)
निम्न दुधना ६८.११
येलदरी ६२.२४
सिद्धेश्वर ३८.७६
माजलगाव ३८.८५
मांजरा ३३.७
पैनगंगा ७३.७१
निम्न तेरणा ६०.२६
विष्णुपुरी ६५.०३
सीना कोळेगाव १९.१९