साताऱ्यात साकारणार वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी; पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ फेब्रुवारी २०२५ | सातारा | सातारा जिल्ह्यात जलपर्यटनासाठी भरपूर वाव आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागातर्फे जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी लवकरात लवकर साकारण्याचा मानस असल्याची माहिती पर्यटन, खनीकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मंत्रालयातील दालनात पर्यटन विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटील, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता बोरसे आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

दूरदृश्य प्रणाली (व्हीसी) द्वारे सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे तसेच इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील सर्वात लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. त्यासोबतच त्यांना जल पर्यटनाचाही आनंद घेता यावा म्हणून सातारा जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी साकारण्यासाठी काम सुरू करण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी दिल्या.

जिल्ह्यातील मुनावळे, कोयना नगर, हेळवाक आणि पापर्डे या ठिकाणी बोट क्लबचे काम सुरू आहे. त्यापैकी काही ठिकाणी बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. मात्र जल पर्यटन फक्त बोटिंगपुरते सीमित न राहता जलक्रीडा अकादमी झाल्यानंतर पर्यटकांना वेगळा अनुभव मिळेल. असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

तसेच हा प्रकल्प साकारल्यानंतर स्थानिक तरुणांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीने काम करण्याचे सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तरुणांना प्रशिक्षणही देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. हा सर्व प्रकल्प सौरऊर्जेवर करण्याच्या विशेष सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!