
दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२२ । सातारा । माण आणि खटाव तालुक्यातील 32 गावांसाठी वरदान ठरणारी जिहे कठापूरची पाणीयोजना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केवळ राजकारणासाठी रखडवली आहे. कृपया या मातीतल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी पाणी योजनेत राजकारण आणू नका असे आवाहन माण विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या योजनेची निविदा तातडीने काढावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीच्या जिहे कठा पूरच्या पाणी योजने संदर्भातील सवंग राजकारणाचे सडेतोड खंडन करत पत्रकारांसमोर वस्तुस्थिती मांडली.
ते पुढे म्हणाले, जिहे-कठापूर योजनेचे शेवटच्या काही मीटरचे ब्लास्टिंग बाकी आहे. या पाणी योजनेसंदर्भात माझ्यावर जे आरोप झाले त्यांची बोलायची राजकीय उंची नाही. ज्या-ज्या वेळी मी शब्द दिला आहे. त्या-त्या वेळी मी शब्द खरा करून दाखवला आहे. माण-खटाव तालुक्यात चार-चार साखर कारखाने सुरू आहेत. ही स्वप्नवत कामगिरी या पाणी योजनेमुळे करणे शक्य झा आहे. जिहे कठापूर योजनेची निविदा येत्या एक महिन्यात काढतात काढण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेच्या दरम्यान दिले होते. मात्र राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन प्रसिद्ध केलेली निविदा रद्द करायला लावली. माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी माण खटावच्या पाणी प्रश्नावर राजकारण आणू नये. आयुक्त दर्जा असणाऱ्या अधिकाऱ्याने उंची असणारे राजकारण करावे. टेंभू योजनेतून 32 गावांना अडीच टीएमसी पाणी उचलून देण्याचा प्रस्ताव 2019 मध्ये मीच दिला होता. विखळे येथे पाणी परिषद झाल्यानंतर माझ्याच पत्रावर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील पाणी फेरवाटप करण्याचेआदेश दिले होते. ज्यांनी नुकताच कृतज्ञता समारोह घेतला त्यांनी या योजनेच्या संदर्भात किमान एक ओळीचे पत्र तरी लिहिले का? मला एखाद्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी जी शक्ती वापरली जाते तीच शक्ती शेतकऱ्यांच्या पाणी योजनेसाठी वापरली तर बरे होईल असा टोला जयकुमार गोरे यांनी प्रभाकर देशमुख यांना लगावला.
पीएमजेवायच्या माध्यमातून केंद्र शासनाने लक्ष्मणराव नामदार पाणीपुरवठा योजनेसाठी 247 कोटी रुपये मंजूर केले. मात्र, या योजनेचे पाणी पूजन होऊ नये याकरता अनेक अडथळे आणण्यात आले. जर तुम्हाला मोदी यांचा निधी चालतो. मग ते जलपूजन कार्यक्रमासाठी का चालत नाही, असा रोखठोक सवाल जयकुमार गोरे यांनी केला. जिहे-कठापूरच्या निविदा रखडवून ठेवण्याचे पाप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले आहे. ही योजना माण खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची अस्मिता आहे. ही योजना लांबविण्याचे पाप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करू नये त्यासंदर्भातील निविदा काढण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. यासंदर्भात जर शासकीय पातळीवर हालचाल झाली नाही तर पुन्हा राज्य शासनाकडे दाद मागून प्रसंगी आमरण उपोषण करण्याचा इशाराही जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आमदार जयकुमार गोरे यांना या योजनेचे श्रेय मिळू नये म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे टेंडर रद्द करायला लावले. मात्र, उंची असणारे राजकारण करा, अगदीच खालच्या पातळीला जाऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. माण व खटाव तालुक्यात पाणी आणण्याची धमक राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाही. कारण तब्बल पंधरा वर्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासारखे निष्क्रिय नेते जलसंपदा विभागाला होते. त्यामुळेच दुष्काळी भागाचे पाणी प्रत्यक्षात आलेच नाही अशी टीका गोरे यांनी केली.
टेंभू योजनेसाठी अनिल देसाई, डॉ. येळगावकर यांचेही प्रयत्न : आमदार गोरे
केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी टेंभू योजनेतून पाणी उपलब्ध होणार नाही, असे सांगितले होते. मात्र, या योजनेतून शंभर गावांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले. या योजनेचे पाणीवाटप तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झाले. यासंदर्भात माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी पत्रव्यवहार केला. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी लाक्षणिक उपोषण केले. या सर्व गोष्टी मला मान्य आहेत. मात्र ज्यांनी योजना समजूनच घेतले नाही ज्यांनी कधी शेतकऱ्यांसाठी एक ओळीचे पत्र लिहिले नाही. त्यांनी ही योजना अडविण्याचे पाप करावे न समजण्याच्या पलीकडचे आहे. माण-खटावचे पाणी अडवू नका. माझ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी जेवढी ताकत लावता तेवढी ताकद पाणी आणण्यासाठी लावा, असा उपरोधिक टोला जयकुमार गोरे यांनी लगावला.
माण तालुक्यात प्रभाकर देशमुख यांच्या बगलबच्च्यांकडून १ लाख ब्रास बाळू उपसा माण-तालुक्यात वाळू तस्करी गुंडांच्या दहशतीचे वातावरण सुरू झाले आहे. गेल्या महिन्याभरात दोन हजार चार हजार ब्रासची चार टेंडर निघाली. ही सर्व टेंडर प्रभाकर देशमुख यांच्या बगलबच्च्यांना देण्यात आली. ज्या योजनेत पाटीने माती खणायची ठरले होते तेथे तब्बल 90 हजार ते एक लाख ब्रास वाळू उपसण्यात आली आहे. येथे कोणीही शेतकरी त्यांना विरोध करू शकत नाही. जो विरोध करतो त्याच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होतात. यासंदर्भात पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, जिल्हाधिकारी शेखर सिंह दलाल यांच्याकडे मी तक्रार यापूर्वीच दिली आहे. नुकतीच माण तालुक्यामध्ये वाकी येथे वाळू उपसणारी वाहने पकडण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतःवरील बालंट टाळण्यासाठी काही चेल्यांची नावे पुढे केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. वाळू सम्राटांची दहशत मी विधानसभेत थेट लक्षवेधी मांडून मोडीत काढणार आहे. या प्रश्नाची तड राज्य शासनाकडे दाद मागूनच लावली जाणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.