निरा देवघर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१२: निरा देवघर प्रकल्पातील पात्र प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. धोमबलकवडी, निरा देवघर प्रकल्प, भाटघर धरण या प्रकल्पांसंबंधीच्या विविध प्रश्नांबाबत आज विधानपरिषदेचे मा.सभापती रामराजे निंबाळकर नाईक यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

धोमबलकवडी, निरा देवघर प्रकल्प, भाटघरधरण या प्रकल्पांसंबंधीच्या विविध प्रश्नांबात विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले, प्रकल्पासाठी संपादन केलेल्या जमिनींच्या बदल्यात संबंधित प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यास आपण बांधील असतो आणि तो त्यांचा हक्कही आहे. त्यामुळे निरा देवघर प्रकल्पातील ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांना अद्याप जमिनी मिळाल्या नाहीत त्यांना त्या मिळतील यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत ज्या अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर झाला असेल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देशही श्री.पाटील यांनी दिले. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर कायदे करण्यात आले आहेत, त्यामुळे पुन्हा शासनाच्या निर्देशांची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तातडीने कार्यवाही करून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे, असेही जलसंपदामंत्री म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!