टेंभू सिंचन प्रकल्पातील पाणी फेरनियोजनाचे काम अंतिम टप्प्यात – जलसंपदामंत्री जयंत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२४ मार्च २०२२ । मुंबई । टेंभू उपसा सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या फेरनियोजनाचे काम अंतिम टप्प्यात असून यावर महिनाभरात अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य अनिल बाबर यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना जलसंपदामंत्री श्री. पाटील यांनी सांगितले की, टेंभू उपसा सिंचन योजनेंतर्गत कृष्णा नदीवर बॅरेज बांधून कृष्णा नदीतील पाणी एकूण ५ टप्प्यांद्वारे उचलण्यात येणार आहे. त्यात सातारा जिल्ह्याच्या ३ गावांमधील ६०० हेक्टर, सांगली जिल्ह्याच्या २०६ गावांमधील ५९ हजार ८७२ हेक्टर आणि सोलापूर जिल्ह्यातील ३१ गावांमधील २० हजार हेक्टर अशा २४० गावांतील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्रास लाभ देण्याचे प्रस्तावित असून कायम दुष्काळी अशा खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सांगोला या तालुक्यांना योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेच्या टप्पा क्र. १ ते ५ तसेच पुणदी व विसापूर उपसा सिंचन योजनेची सर्व कामे पूर्ण आहेत. योजनेच्या एकूण ४५१ कि.मी. लांबीपैकी ४४६ कि.मी. लांबी पूर्ण व कालवे प्रवाहित झाले आहेत. उर्वरित कालवा कामे जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सांगोला, माण व खटाव तालुक्यातील अनेक गावे टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रालगत असली तरी सिंचनापासून वंचित आहेत. योजनेच्या उरलेल्या गावात पाणी पोहोचण्यासाठी आवश्यक आराखडा तयार झाला आहे, त्यानंतर निविदा काढून पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या योजनेतील पाण्याच्या फेरनियोजनाचा संबंध हा कृष्णा लवादाच्या निर्णयाशी असल्याने संबंधित वकीलांचा सल्ला घेण्यात आला, या सर्व प्रक्रियेला त्यामुळे वेळ लागला असून आता फेरनियोजनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. कृष्णा खोरे महामंडळाकडून यासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त झाल्याचेही मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!