दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२१ । सातारा । होणार होणार म्हणून चर्चेत असणाऱ्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेचे पाणी अखेर शाहूपुरीत दाखल झाले . या योजनेच्या उपसापंपाची कळ दाबून खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले .
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमा अंर्तगत आज सातारा शहरालगत असलेल्या शाहूपुरी व उपनगराला संजीवनी ठरलेल्या कण्हेर योजनेचे पहिल्या टप्प्यात पाच लाख लीटर पाणी येथील भैरोबा टाकीत भरून घेण्यात आले . या कार्यक्रमास सातारा विकास आघाडीचे नगरसेवक अॅड दत्ता बनकर, नगरसेवक वसंत लेवे माजी उपसभापती संजय पाटील, अमित कुलकर्णी, नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, माजी उपसरपंच राजेंद्र गिरीगोसावी, अनिरूध्द दाभाडे, सागर माने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता पल्लवी चौगुले, प्रकल्प अभियंता सतीश अग्रवाल, इं यावेळी उपस्थित होते .
तब्बल42.98 कोटी रुपयांच्या या योजनेची पूर्तता झाल्याचे विशेष समाधान उदयनराजे यांनी व्यक्त केले . शाहूपुरीकरांना तब्बल वीस वर्ष पाण्यापासून का वंचित ठेवण्यात आले ? मगर देर है लेकिन अंधेर नही अशा खास अंदाजात उदयनराजे यांनी व्यक्त होत आम्ही शब्द दिला की वचनपूर्ती करायला कमी पडत नाही याची सुध्दा आठवण करून दिली . या योजनेत एकूण साडेनऊ हजार नळ कनेक्शन दिली जाणार असून या कनेक्शनचे मागणी फॉर्म उपलब्ध असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले . योजनेचे चलनवलन गतीला येईपर्यंत सुरवातीला प्रायोगिक तत्वावर ही जवाबदारी प्राधिकरणाकडे राहणार असून मग दोन टप्प्यात ती पालिकेकडे हस्तांतरित होणार आहे . कण्हेर योजनेतून साधारण चार एमएलडी पाणी उपसा केला जाणार असल्याचे प्रकल्प अभियंता सतीश अग्रवाल यांनी सांगितले . उदयनराजेंनी या योजनेच्या कार्यारंभाचा कोणताच गाजावाजा न करता थेट कण्हेर योजनेचा स्वीच दाबून शाहूपुरीकरांना आश्चर्याचा धक्का दिला .
कण्हेर पाणी पुरवठा योजना
मूळ किंमत – 31 कोटी 31 लाख
सुधारीत किंमत – 42.98 लाख
तब्बल साडेदहा किलोमीटरची पाईपलाईन
पंपगृहात दीडशे एचपीचे तीन पंप
एकूण कनेक्शन _ 9700
तत्काळ कनेक्शन वाटपाला होणार सुरवात
दरे बुद्रक आणि पंचक्रोशीला दररोज मिळणार पाणी
चार लाख एमएलडीचा प्राधिकरणाचा भार होणार कमी