दैनिक स्थैर्य | दि. ०४ फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बारमाही सिंचनाची परंपरा धोक्यात येत आहे, या गंभीर प्रश्नावर डॉ. शिवाजीराव गावडे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. नीरा देवघर व गुंजवणीचे अतिरिक्त पाणी भविष्यात १६ ते १८ टीएमसी ने कमी होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे सिंचन धोक्यात येत आहे.
नीरा देवघर व गुंजवणीचे अतिरिक्त पाणी जे २००५ च्या आसपास मिळाले होते, ते भविष्यात १६ ते १८ टीएमसी ने कमी होणार आहे. यामुळे नीरा उजवा कालव्याचे सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होऊ शकणार नाही. हे पाणी वाढीव असल्याने जादाचे परवाने दिले गेले होते, त्यामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.
गेल्या शंभर वर्षातील येथील शेतकऱ्यांची बारमाही सिंचनाची परंपरा खंडित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नीरा देवघरचे पाणी धोम-बलकवडी कालव्यात सोडण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन चे काम सुरू असल्याने ही स्थिती औरच गंभीर होत आहे.
डॉ. शिवाजीराव गावडे यांनी स्पष्ट केले की, जर सर्वपक्षीय नेतृत्व व जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय खुला आहे. गोखळी (पंचबिघा) ता. फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत हे प्रश्न मांडले गेले.
जलजीवन मिशन, वाढते औद्योगिक वापर व शहरासाठी लागणारा पाणीपुरवठा यामुळे नीरा उजवा कालव्याचे पाणी कमी होणार आहे. शेतीसाठी अतिशय कमी पाणी उपलब्ध होईल, याची भीती व्यक्त केली गेली आहे. कारखाने अथवा शहरांमध्ये वापरले जाणारे पाणी रिसायकलिंग करून पुनर्वापर करण्यात येत नाही, यामुळे पाणी कमी होत आहे.
सोळशी प्रकल्पामध्ये जे जादाच पाणी आहे ते फलटण तालुक्याला नीरा उजवा कालव्यातून देण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी एकत्रितरित्या मोट बांधून पाणी मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याच्या विचारामध्ये आहेत.