दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२१ । सातारा । केसरकर पेठेतील मानस हॉटेलसमोरील व्हॉल्वला तब्बल नऊ तास गळती लागून लाखो लीटर पाणी वाया केले . या घटनेचा निषेध म्हणून भाजपचे स्वीकृत नगरसेवक सुनील काळेकर यांनी याच गळतीचे पाणी बादलीत भरून पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनसमोर ओतले . सोमवारी सकाळी अचानक झालेल्या प्रकाराने पालिकेत एकच खळबळ उडाली .काळेकर आणि त्यांच्या समर्थकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली . ही गळती जर तत्काळ थांबली नाही तर पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना याच पाण्याने अंघोळ घालण्याचा इशारा काळेकर यांनी दिला आहे .केसरकर पेठेला घोरपडे टाकीतून पाणी पुरवठा केला जातो . त्यासाठी सकाळी पाच वाजता पाणी टाकीचे व्हॉल्व खुले केले जातात . मात्र बऱ्याच वर्षापासून येथील मानस हॉटेल समोरील रस्त्यावर पालिकेची जुनी जलवाहिनी असून त्याला गळती लागली आहे . मात्र पाणी पुरवठा विभागाने वारंवार दुरूस्ती करूनही येथील गळती आजतागायत निघालेली नाही . सोमवारी सकाळपासूनच येथील व्हॉल्वच्या दाबाने रस्त्यावरच पाण्याचे कारंजे तयार होऊन लाखो लीटर स्वच्छ पाणी रस्त्यावरून वाहून गटारात जात होते .पालिकेच्या कार्यालयापासून अवघ्या दहा फुटावर पाण्याचे लोट रस्त्यावरून वहात असताना या गळतीची पाणी पुरवठा विभागाने कोणतीच गंभीर दखल घेतली नाही .
या गळतीचे व्हिडिओ सोशल मिडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल झाले . भाजपचे स्वीकृत नगरसेवक आणि त्यांचे समर्थक बादली घेऊन घटनास्थळी हजर झाले . गळतीचे पाणी बादलीत भरून ते पाणी काळेकर यांनी पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या दालनासमोर ओतले . अचानक भाजप नगरसेवकाच्या झालेल्या या आंदोलनाने पालिका कर्मचाऱ्यांची एकच पळा पळ झाली . काळेकर यांनी शहरातील गळती प्रश्नावर थेट मुख्याधिकाऱ्यांनाच अंघोळ घालण्याचा इशारा दिला . काळेकर समर्थकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला . पाणी पुरवठा सीता हादगे यांनी त्काळ या आंदोलनाची दखल घेउन कर्मचारी गळती काढण्यासाठी रवाना केले .