
दैनिक स्थैर्य । 29 जुलै 2025 । सातारा ।धोम धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने कृष्णा नदीला पूर आला असून गणपती मंदिरात पाणी शिरले आहे. गणपती मंदिरास पाण्याचा वेढा पडला असून मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. महागणपती पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला असला तरी रात्री नदीपात्रातील पाणी वाढल्यास पूल बंद करण्याची शक्यता आहे. पश्चिम भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे.
धोम धरण परिसरात पावसाचाजोर कायम असल्याने धरण 86.24 टक्के भरले आहे. धोम बलकवडी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणामध्ये मोठी आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता सद्यस्थितीत नदीपात्रामध्ये सांडव्यावरून सुरू असलेला 1902 क्युसेक्स विसर्गव विद्युत गृहातून 330 क्युसेक्स असे एकूण 2232 क्युसेक्स मध्यरात्री 1000 क्युसेक्स वाढवून एकूण 3232 क्युसेक्स पाणी पात्रात सोडण्यात आले आहे. धोम बलकवडी घरणाखालील कृष्णा नदीपात्रामध्ये आवके नुसार टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात अथवा कमी करण्यात येवू शकतो.
धोम बलकवडी धरणाखालील कृष्णा नदीकाठच्या सर्व नागरिक, कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत,सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन जलसंपदा व प्रशासनाच्यावतीने विभाग करण्यात आले आहे. नदीचा पूर पाहण्यासाठी नागरिक व अबालावृद्ध गर्दी करीत असून काही हौशी तरुण सेल्फी घेण्यासाठी पाण्याशेजारी जात आहेत.