दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२१ । खंडाळा । खंडाळा तालुक्यातील निरा- देवघर लाभक्षेत्रातील गावांमध्ये पावसाने ओढ दिली असल्याकारणाने पिकपाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली सचिव डॉ विजय शिंदे यांनी निरा- देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांचे संपर्क करून त्यांना पाणी आवर्तन देणेविषयी विनंती केली यास सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी दि. १४ सप्टेंबर सकाळी १० वाजल्यापासून १५० क्युसेक्सने व तो वाढवुन दि. १७ सप्टें सायं ५ वाजल्यापासून २०० क्युसेक्सने विसर्ग कालव्यात सुरु केला.
यामुळे खंडाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील पिकपाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होणार आहे.
या बद्दल डॉ विजय शिंदे सचिव खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठान यांनी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल व त्यांचे सर्व सहकारी यांचे तालुक्यातील शेतक-यांच्या वतीने आभार मानले.