दोन पाझर तलाव पुनर्जीवित करून गावात 54 कोटी 83 लाख लिटर पाण्याची ‘वॉटर बँक’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २६ : दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोरेगाव तालुक्यातील आसनगावमधील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन डोंगराच्या पायथ्याशी असलेले दोन पाझर तलाव पुनर्जीवित करून गावात 54 कोटी 83 लाख लिटर पाण्याची ‘वॉटर बँक’ उभी केली आहे. पावसाळ्यात या बँकेत जास्तीचं पाणी साठवलं जात असून उन्हाळ्यात ते शेतासाठी वापरले जाणार आहे.

सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना अधूनमधून टंचाईचा सामना करावा लागलेला आहे. साधारणपणे चार वर्षातून एकदाच सुजलाम् सुफलाम् अशी परिस्थिती पहावयास मिळते. हे चक्र भेदण्यासाठी पाणी समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी काही गावांमध्ये जलसंधारणाचे काम फार महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्या गावांमध्ये गावाच्या शिवारातील पाणी गावातच साठवून भूपृष्ठावर जलसाठे निर्माण करणे आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढविणे यावर भर देण्यात आला आहे. आसनगावात सततच्या टंचाईमुळे स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. पाणीटंचाईमुळे शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे स्थलांतराशिवाय पर्याय नाही. जलसंधारणामुळे या गावाला पाणीटंचाईवरील उपाय सापडला. लोकसहभाग व शासकीय योजनांच्या माध्यमातून कामे झाली. चांगला पाऊस झाला. पडणार्‍या पावसाचा थेंब न थेंब साठवला गेला. सर्व बंधारे, नदीपात्र, सलग समतर चर पूर्ण भरून आसनगाव टंचाईमुक्त झाले. समतल चराचे सुमारे चारशे एकरावर काम पूर्ण झाले. कोट्यवधी लिटर पाणी गावाच्या शिवारात जिरले. जलयुक्तच्या कामामुळे शिवार जलमय झाला. पण डोंगराच्या परिसरात वाघजाई पाझर तलाव पाण्याची गळती आणि गाळ साचल्याने दोन पाझर तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर होते. याच्या पुनर्जीवनासाठी गावकरी एकत्र आले. शेतकर्‍यांनी सुमारे चार लाख रुपयांची वर्गणी जमा केली. खासगी कंपन्यांनी आपल्या सामजिक दायित्व निधीतून अभियान राबविण्यात आले. आसनगाव व शहापूर ग्रामस्थांच्या सहभागातून वीस लाख खर्चून दोन तलावांचे खोलीकरण, रुंदीकरण करून गळती काढण्यात आली. पहिल्याच पावसात तलावात पाणीसाठा झाला. जमिनीत पाणी मुरल्यामुळे परिसरातील काही विहिरींना पाणी आले. गावकर्‍यांची मेहनत फळाला आली. ‘गाव करील ते राव काय करील’ या म्हणीचा प्रत्यय आला.

शासकीय अधिकार्‍यांच्या इच्छाशक्तीमुळे व लोकांच्या सहकार्याने ते पेलता आले. आसनगाव परिसरातील पाणी टंचाईचे चित्र बदलण्यास मदत झाली आहे.

स्वप्नील शिंदे, जलमित्र, आसनगाव.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!