
दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२२ । सातारा । रहिमतपूर ते कराड रस्त्यावर असणाऱ्या तारगाव तालुका कोरेगाव येथील रेल्वे क्रॉसिंग पुलाखालील बोगद्यामध्ये पाणी साठल्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे यामध्ये गाड्या घसरून अपघात होत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की तारगाव रेल्वे स्टेशन नजीक रेल्वे क्रॉसिंग साठी गेल्या अनेक वर्षापासून बोगदा अस्तित्वात आहे.रेल्वे दुहेरीकरणाच्या कामाच्या वेळी या बोगद्याची लांबी वाढवण्यात आली. तसेच तारगाव ते तारगाव स्टेशन या अंतर्गत रस्त्याचे हे डांबरीकरण करण्यात आले. जवळपास तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तारगाव मधून पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली होती, त्यावेळीही त्या अरुंद रस्त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता. तारगाव ते स्टेशन या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. परंतु, स्टेशन ते बोगद्या खालून जाणाऱ्या रस्त्यावर अंदाजे 400 मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात चिकल पसरला आहे. या चिखलात अनेक चार चाकी वाहने अडकून पडत आहेत. तर दुचाकी वाहने घसरून पडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. तसेच रेल्वे पुलाचे बांधकाम झाल्यानंतर रेल्वेच्या पुलाखाली कॉंक्रिटीकरण करण्यात आले. परंतु, रस्त्यावरून येणारे पाणी बाहेर जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे या पुलाखाली जवळपास दोन फुटापेक्षा जास्त पाणी पातळी वाढले आहे. या पाण्यातून वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. तसेच मोहितेवाडी, किरोली, बेघर वस्ती येथील अनेक विद्यार्थी शेतकरी हायस्कूल तारगाव येथे शाळेसाठी जात असतात. या सर्व विद्यार्थ्यांना या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. तसेच शेतात जाणाऱ्या नागरिकांनाही या पाण्यातूनच जावे लागत आहे. याचा त्रास वाहन चालका बरोबर नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात होत आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रेल्वेच्या हद्दीत असणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यास रेल्वे प्रशासनाने मनाई केली. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होऊ शकले नाही. रेल्वे प्रशासनानेच उर्वरित रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे. रेल्वे प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने ताळमेळ घालून या उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण करून घ्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.