दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध संघटना आहेत. या सर्व संघटनांनी सभासदांच्या आग्रहास्तव एकत्र येत शिक्षक बँकेतील आर्थिक लूट रोखण्यासाठी सर्वसमावेशक संघटनाविरहित पॅनेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विविध संघटना असल्यास तरी समितीचेच उमेदवार असून या सर्व सर्व २१ उमेदवारांना जिंकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे यांनी केला.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक संघटनाविरहित पॅनलची निवडणूकविषयक भूमिका विशद करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिक्षक नेते संभाजीराव थोरात, मनोमिलनाचे प्रणेते बलवंत पाटील, दीपक भुजबळ, चंद्रकांत यादव, विश्वंभर रणनवरे आदी उपस्थित होते.
परिवर्तन पॅनलचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव घोरात, समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे, पॅनेल मनोमिलनाचे प्रणेते बलवंत पाटील, अखिल भारतीय शिक्षक संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष दीपक भुजबळ, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, प्राथमिक शिक्षक बँकेचे सुमारे दहा हजार सभासद आहेत. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी २१ जागेसाठी २१ अभ्यासू उमेदवारांची सर्व समावेशक सभासद परिवर्तन पॅनेलमध्ये निवड करण्यात आली आहे. यासाठी अनेक मान्यवर शिक्षकांनी मोठ्या मनाने उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. काही सभासदांनी स्वयंस्फुतीने प्रचार यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे सभासद परिवर्तन पॅनलचा विजय निश्चित झाला आहे. विक्रमी मतांनी सर्व उमेदवार विजयी होणार असून पुढील पाच वर्षात बँकेमध्ये पारदर्शक व विश्वासदर्शक कामकाज केले जाणार आहे.
केवळ बँक म्हणून लोकांसमोर जाणार नाही तर सभासदांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सत्तेचा उपयोग करणार आहे. आम्ही जी भूमिका लोकांसमोर जाणार आहोत, त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणार आहोत. सहकारी क्षेत्रात जेवढ्या बँका आहेत त्यात शिक्षक सहकारी बँक अग्रेसर राहण्यासाठी आहे. काही स्वत:चे कर्तुत्व झाकण्यासाठी इतर वर आरोप करतात. परंतु, शिक्षक संघ व समिती नाते जुने आहे. सातारा नव्हे तर राज्य हे कार्यक्षेत्र आहे. आमचा रक्तगट एक आहे. परंतु, आम्ही एकमेकाविरोधात जीवघेणे काम केले आहे. परंतु, आता महाराषट्रात चाळीस संघटना एकत्र आल्या आहेत. आम्ही सभासदांमध्ये जातो तेव्हा सभासदांचीही आम्ही एकत्र येण्याचीच मागणी आहे. त्यामुळे एकत्र आल्यानंतर एकही सभासद नाराज नाही. बंडखोरी होण्याची शक्यता नाही. एकत्र आल्यानंतर ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही.
सध्या परदेशी बँका कमी व्याजदरात कपात करत आहेत. त्यामुळे इथला खातेदार त्या बँकांकडे वळल्यास शिक्षक बँकेचे नुकसान होईल. साडेनऊ हजार सभासदांच्या विकासास प्राधान्य देत पारदर्शक कारभार करणार असल्याचे सांगितले. परिवर्तन पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ कुरणेश्रर मंदिर होणार असून सप्तपदी कार्यालयात कार्यकर्ता मेळावा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मागील चार वर्षाच्या कालावधी शिक्षक बँकेत आर्थिक लूट व नोकर भरतीने गरीब शिक्षकांच्या बँकेला आर्थिक फटका बसला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक बँकेची प्रतिमा काहीशी मलीन झाली आहे. त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज सर्व सभासद शिक्षकांनी बोलून दाखवल्याचेही त्यांनी सांगितले.