दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । सातारा । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २०१९ मध्ये तुमच्या पक्षाचे काही आमदार घेऊन पहाटेचा शपथविधी करून ४८ तासांचे सरकार करण्याचा प्रयत्न केला ते करताना पक्षप्रमुख पवार साहेबांना विचारले होते का? मग आपण केलेली ती बेईमानी नव्हती का? असा प्रतिसवाल राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांना केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पक्षात राहिले,वाढले त्याच ठिकाणी त्यांनी बेईमानी केली अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर होती या टीकेला उत्तर देताना मंत्री देसाई कडाडले.ते पाटण येथील त्यांच्या दौलतनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
मंत्री देसाई म्हणाले,एकनाथ शिंदे हे स्वाभिमानी नेते आहेत. ४० आमदार १२ खासदार १४ राज्यांचे राज्यप्रमुख, बहुतांशी जिल्हाप्रमुख शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत त्यांच्या भुमिकेला व उठवाला अजित पवार बेईमानी शब्द वापरतात, हे पूर्णपणे चुकीचे असून २०१९ मध्ये तुमच्या पक्षाचे काही आमदार घेऊन तुम्ही पहाटेचा शपथविधी करून ४८ तासांचे सरकार करण्याचा प्रयत्न केला ते करताना पक्षप्रमुख पवार साहेबांना विचारले होते का? मग आपण केलेली ती बेईमानी नव्हती का?असा प्रश्न आम्ही विचारला तर तो योग्य होईल का?असा प्रतिसवाल करून मंत्री देसाई म्हणाले आपली काम करण्याची पद्धत सडेतोड असली तरी बोलताना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, शिंदे साहेबांच्या लाखो समर्थकांमध्ये असंतोष होणार नाही याची खबरदारी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्यांनी घेणे गरजेचे आहे त्यामुळे बोलताना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी शिंदे समर्थक यापुढे असली वक्तव्ये कदापी ही सहन करणार नाहीत. असा इशारा ही मंत्री देसाई यांनी अजित पवार यांना दिला.
शिवसेना प्रमुखांचे विचार हिंदूत्वाच्या विचारांपासून बाजूला नेण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात केल्याचा आरोप करून शिवसेना प्रमुखांचे विचार जोपासण्याचे काम खऱ्या अर्थाने आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करीत आहोत म्हणूनच संपूर्ण राज्यातुन आमच्या उठावला भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान काँग्रेस चे आमदार फडणवीसांच्या संपर्कात असल्याच्या चंद्रकांत खैरे यांच्या विधानाचा समाचार घेताना मंत्री देसाई यांनी खैरे यांना सध्या काम नाही म्हणून ते सध्या आमच्यात भांडणे लावायचा उद्योग करीत आहेत १६आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे आमच्या सर्वच सोळा आमदारांना न्याय मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.