स्थैर्य, फलटण : शेतकरी आणि शेतकऱ्याच्या ऊसाच्या बिलाची कायमच बोंब झालेली पाहायला मिळत असते. ज्या कारखान्यात शेतकरी आपला ऊस हक्काने देत असतात. तिथेच मात्र उसाच्या बिलापासून त्यांना कित्येक वर्षे वंचित राहावे लागत असते. न्यु फलटण शुगर वर्क्स साखरवाडी ता.फलटण या कारखान्यास २०१७-१८ च्या गळीप हंगामात दिला होता. सदर गाळप हंगामातील ऊसबिल अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नसून याबाबत मा.साखर आयुक्त साखर आयुक्तालय,पुणे यांना पत्रव्यवहार करीत लक्ष देण्याची विनंती ही फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे. ऊसाचे बिल कारखाना बंद पडल्याने मिळाले नव्हते. सदर कारखाना सन २०१९-२० या गाळप हंगामामध्ये श्री.दत्त इंडिया प्रा.लि.या कंपनीने विकत घेतला आहे. श्री.दत्त इंडिया प्रा.लि.ने सन २०१७-१८ या गाळप हंगामातील थकीत ऊस बिल शेतकऱ्यांपैकी पन्नास टक्के शेतकऱ्यांची बिले दिली आहेत व उर्वरित गरीब शेतकऱ्यांचे बिल मिळण्यासाठीचे फाॅर्म भरून घेतले आहेत. परंतु अजूनही उर्वरित शेतकऱ्यांना ऊसबिले मिळालेली नाहीत. मागील वर्षी गळीप हंगाम चालु असताना शेतकऱ्यांनी कारखान्या विरोधात थकीत बिल मिळण्यासाठी आंदोलन केले होते. सदर थकीत बिलाची रक्कम दि. २८/२/२०२० पर्यंत शेतकऱ्यांच्या खाती जमा होईल. अशा प्रकारचे आश्वासन कारखाना प्रशासनाकडून डिसेंबर २०१९ मध्ये देण्यात आले होते. परंतु आज सात महिने होऊन गेल्यानंतरही कारखान्याकडुन कोणतीही दखल घेतली जात नाही. शेतकरी याबाबत विचारणा करायला गेले असता कारखान्याचे मालक शेतकऱ्यांना भेटत सुध्दा नाहीत व कारखाना प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत आहे. आजपर्यंत उसने पैसे घेऊन कर्ज नियमित ठेवले होते. परंतु सदर बिल न मिळाल्याने आज बॅंकेचे हप्ते थकलेले आहेत. परिस्थिती नाजुक झालेली आहे. बॅंकेतील पत ढासळत आहे. त्यामुळे आज शेतकऱ्याला कुटुंबासहित आत्मदहनशिवाय काही पर्याय राहिलेला नाही. तरी आपण या विषयात लक्ष घालुन दि.१५ ऑगस्ट पर्यंत आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अन्यथा कुटुंबासह स्वातंत्र्यदिनी राहत्या घरी आत्मदहन करण्याचे निश्चित केले असून आपणाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा शेतकरी अमोल अविनाश काकडे, शिवेंद्रराजे पांडुरंग शिंदे, शंभूराजे राजेंद्र शिंदे, कावेरी पांडुरंग शिंदे, भगवान विष्णू शिंदे, राजेंद्र विष्णू शिंदे,पोपट दाजीराम पवार,राजेद्र पवार आदींनी व्यक्त केली आहे.