दैनिक स्थैर्य | दि. १४ जानेवारी २०२५ | फलटण |
‘प्रजासत्ताक दिनी’ २६ जानेवारी रोजी राष्ट्रध्वज फडकविताना भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा फलटण येथील हरिष हणमंत काकडे व सहकार्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी सो तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीला दिले आहे.
निवेदनात काकडे यांनी म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडरक यांनी दि. २६ नाव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान, संविधान सभेला सादर केले तो दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येत असतो. तसेच दि. २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधानाचा अंमल चालू झाला, म्हणजेच भारत प्रजासत्ताक झाला. त्या दिवसाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकविण्यात येत असतो; परंतु डॉ. बाबासाहेबांचा विसर आज शासन व प्रशासनाला पडलेला दिसत आहे. म्हणून “प्रजासत्ताक दिनी” राष्ट्रध्वज फडकविताना भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून व संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करावे.
निवेदन देताना हरिष काकडे यांच्यासह राकेश जगताप, राजू कांबळे, दत्तात्रय अब्दागिरे व सनी कदम हे उपस्थित होते.