वारकरी परंपरा जयघोषाच्या आवर्तनात अडकली – शिवाजी राऊत यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ नोव्हेंबर २०२२ । सातारा । महाराष्ट्रातील संत परंपरा व वारकरी परंपरा जयघोषाच्या आवर्तनात अडकली आहे. या संतपरंपरेचे प्रबोधन अद्याप मूर्ती पूजेच्या पलीकडे जाती निर्मूलनासाठी जात नाही हे वास्तव आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शिवाजी राऊत यांनी सातारा येथे बोलताना केले.

सातारा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून ” वारकरी संतांची परंपरा व प्रबोधन ” या विषयावर शिवाजी राऊत यांचे व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती वैदेही देव होत्या. विचारमंचावर खजिनदार मदनलाल देवी व कार्यवाह विजय मांडके होते. संत निवृत्तीनाथ ,संत सोपानकाका , संत ज्ञानेश्वर व संत मुक्ताबाई या भावंडांचा जीवन प्रवास क्रांतिकारक आहे हे आधुनिक क्रांतिकारक आहेत संत ज्ञानेश्वर हे संस्कृत ला पर्याय देणारे भाषिक शास्त्रज्ञ आहेत आणि याबद्दल महाराष्ट्र त्यांचा कायम ऋणी राहील ते मराठी भाषेचे उद्गाते निर्मिक आहेत त्यांचे काम धर्म सुधारण्याच्या पलीकडे जाणारे मोठे काम होते असे विचारही शिवाजी राऊत यांनी मांडले. – वारकरी संत परंपरेची ठिकाणे पंढरपूर , आळंदी , नेवासे ,पैठण , वैजनाथ , बार्शी , नरसी ब्राह्मणी , गंगाखेड , सासवड , त्रिंबकेश्वर , पिरंगुट , अशी आहेत असे सांगून शिवाजी राऊत म्हणाले की संत ज्ञानेश्वर हे आद्य भाषा क्रांतिकारक तर संत तुकाराम हे लोककवी व लोकांच्या हृदयाला हात घालणारे असे संत होत. ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य कृष्णराव चव्हाण यांनी संजीवन समाधी सोहळ्याच्या अनुषंगाने अभंग सादर केला. खजिनदार मदनलाल देवी यांनी संघाच्या विविध उपक्रमांची माहिती याप्रसंगी दिली. कार्यवाह विजय मांडके यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. यावेळी शिवाजी राऊत यांनी त्यांची पुस्तके सभासदांना भेट दिली. या कार्यक्रमास आवर्जून कॉम्रेड किरण माने , विजय पवार , विजयकुमार लांडगे , प्रकाश खटावकर , उपाध्यक्ष श्रीमती ज्योती मोहिते व भिकाजीराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!