वारकरी भवन हा स्तुत्य उपक्रम : भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील; वारकऱ्यांना या भवनाचा फायदाच

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण येथील वारकरी भवन, वारकरी निवास आणि सभागृह उभारणी स्तुत्य उपक्रम असून पालखी मार्गावर होत असलेला त्रिवेणी योग आहे. त्यापैकी वारकरी भवन लोकार्पण सोहळा प्रेरणादायी असून पालखी महामार्गावरुन आळंदी पंढरपूरकडे ये – जा करणाऱ्या वारकऱ्यांना या भवनाचा उपयोग होईल असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

सकल संत सांप्रदायिक व अध्यात्मिक आणि सामाजिक विकास सेवा संस्था (वारकरी संघटना) फलटणच्या माध्यमातून मलठण, फलटण येथे उभारण्यात आलेल्या माजी खासदार लोकनेते कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन लोकार्पण, वारकरी निवास व सांप्रदायिक विचारमंथन सभागृह भूमिपूजन आ. चंद्रकांत दादा पाटील यांचे हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. अध्यक्षस्थानी ह. भ. प. गणपतराव बाबुराव तथा बबनराव निकम (भाऊ) होते, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रचे मार्गदर्शक युवकमित्र ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. समाधान औताडे, आ. जयकुमार गोरे, भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ह.भ.प. केशव महाराज जाधव, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अड. नरसिंह निकम, नगर परिषद विरोधी पक्ष गटनेते अशोकराव जाधव, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अनुप शहा, सचिन अहिवळे, सुशांत निंबाळकर यांच्यासह फलटण शहर व तालुक्यातील वारकरी, भाविक आणि मलठणकर नागरिक, महिला उपस्थित होत्या.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात चर्चिले गेले मात्र त्यांना संधी मिळाली नाही, तथापी आगामी कालावधीत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर केंद्रीय मंत्रिमंडळमध्ये असावेत असा आशिर्वाद वारकरी बांधवांनी द्यावा, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर केंद्रीय मंत्री होवोत अशी अपेक्षा आ. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा मार्गावरील फलटण येथे वारकऱ्यांसाठी हक्काचे निवासस्थान आणि समाज प्रबोधनासाठी व्यासपीठ असावे अशी मागणी आता प्रत्यक्षात साकारली आहे, तथापी बबनराव निकम भाऊ, केशव महाराज जाधव, छगन महाराज, डी. एम. घनवट, जे. एल. काटकर, दादासाहेब भोसले यांनी ठोस भूमिका घेवून हे काम पूर्णत्वास नेल्याबद्दल त्यांना धन्यवाद देत यापुढे देखील सर्वांनी राजकारण विरहीत त्यांना सहकार्य करावे असे आवाहन ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांनी केले, वारकरी भवन उभारणीसाठी राजकारण विरहित अनेकांनी सहकार्य, मदत केल्याने वारकरी भवन वारकऱ्यांना लाभदायक ठरणार असल्याचे स्पष्ट करीत आता येथे दर महिन्याला भक्ती मेळा सुरु करावा अशी अपेक्षा ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी यावेळी व्यक्त केली.

सद्गुरु प. पू. हरिबुवा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मलठण (फलटण) भूमीत वारकरी भवन उभे राहिले असून लवकरच वारकरी निवास व सांप्रदायिक विचारमंथन सभागृहाचे काम पूर्णत्वास जाईल. वारकरी सांप्रदाय निराशावाद्यांना आशावादी बनवितो आणि संप्रदायातून ईश्‍वरी श्रध्दा वाढते, जगण्याची आशा निर्माण होते. मलठण येथील प. पू. हरिबुवा महाराज समाधी मंदिर परिसरात, संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी मार्गावर व संतांच्या भूमीत वारकरी भवन, निवास व सभागृह उपक्रम वारकरी बांधवांच्या उपस्थितीत पार पडत आहे हा त्रिवेणी संगम असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

मलठण वारकरी संप्रदायातील अनेकांची वारकऱ्यांसाठी फलटण येथे वारकरी भवन असावे अशी मागणी होती, माजी खासदार लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचीही तशी इच्छा होती, त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी काही करण्याची अनेक दिवसांची इच्छा मनात असताना वारकरी भवनच्या माध्यमातून त्याच्या पुर्ततेची संधी प्राप्त झाली. दान करताना ते सत्पात्री असावे या भावनेतून वारकरी भवन उपक्रम पूर्णत्वास गेल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

प्रारंभी सकल संत सांप्रदायिक व अध्यात्मिक आणि सामाजिक विकास सेवा संस्थेचे (वारकरी संघटना) अध्यक्ष ह.भ.प. केशव महाराज जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात वारकरी भवन, वारकरी निवास आणि सभागृह उभारणी बाबत सविस्तर माहिती देवून भविष्यात सर्वांच्या सक्रिय साथीने या इमारतींच्या माध्यमातून फलटणच्या धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरेला साजेसे काम करुन फलटणचे या क्षेत्रातील स्थान उंचावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमातच नगर परिषदेतील विरोधी पक्ष गटनेते यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


Back to top button
Don`t copy text!