कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा पायीवारी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. आता संतांच्या पादूका पायीवारी ऐवजी वाहनातून थेट पंढरपूरला पोहोचतील व तेथे प्रतिकात्मक पायीवारी होऊन आषाढीवारीचे सर्व धार्मिक, परंपरागत कार्यक्रम पूर्ण केले जातील. वारीच्या या बदलाला महाराष्ट्रातील सर्व वारकर्यांनी व श्री विठ्ठल भक्तांनी अगदी सहजपणे व आनंदाने स्वीकारले. कोणत्याही दीर्घ परंपरेतील एखादा छोटासा बदल स्वीकारतानाही मोठी खळखळ होते, इतक्या सहजपणे तो स्वीकारला जात नाही. मात्र, वारकरी संप्रदाय त्याला अपवाद ठरला. अनेकांना त्याचे आश्चर्य वाटले व सर्वांनी वारकर्यांचे कौतुकही केले. वारकरी संप्रदायाचे मुळ तत्त्वज्ञान आणि त्याच्या स्थापनेचा काळ व प्रक्रिया विचारात घेतली, तर यात नवल वाटण्याचे कारण नाही. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी व्यापक परिवर्तन घडवून आणणे हाच तर या संप्रदायाचा मुलाधार आहे. त्याच वैचारीक परंपरेप्रमाणे वारकर्यांनी वारीमध्ये झालेला बदल तात्काळ स्वीकारला व ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती…’ हा अभंग केवळ पाठापुरता नसून प्रसंगानुरूप आमचे वर्तनही तसेच असते, हे सामान्य वारकर्यांनी सिद्ध करुन दाखवले. त्यामुळे सारे वारकरी कौतुकास पात्र आहेत.
यानिमित्ताने वारी आणि वारकरी संप्रदायाच्या वाटचालीचा मागोवा घेणे मला क्रमप्राप्त वाटते. इसवी सन पूर्व 300 व्या शतकापासून ते इसवी सन 11 व्या शतकापर्यंत भारतात मोठा सुवर्णकाळ नांदत होता. मौर्य, सातवाहन (शालीवाहन), पुर्वचालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य आणि यादव या घराण्यांनी याकाळात भारतात सुवर्णयुग आणले असा प्राचीन भारताचा इतिहास आहे. इथपर्यंत भारतीय धर्म व संस्कृती परंपरेमध्ये बुद्धीप्रामाण्यवाद आणि विवेकनिष्ठ विचार प्रभावी होता. 12 व्या व 13 व्या शतकापासून मध्ययुगाला प्रारंभ झाला आणि भारतीय परंपरेमध्ये बुद्धीप्रामाण्य बाजुला जावून ग्रंथप्रामाण्य प्रमाण मानले जाऊ लागले. त्यामुळे कर्मकांड आणि अंधश्रद्धा अधिक प्रभावी झाल्या. परिणामी कर्माधिष्ठीत समाज व्यवस्थेऐवजी वर्णाधिष्ठीत समाजव्यवस्था वाढीस लागली. यामध्ये अनेकांना त्यांचे अधिकार नाकारण्यात आले. विवेक संपून अविचार बोकाळला, सत्य आणि स्वत्वपणाला लागले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रापूरता विचार केल्यास सर्वप्रथम श्री चक्रधर स्वामींनी याविरोधात प्रखर आवाज उठवला. महानुभाव पंथांचा उदय हा त्यांच्याच काळातला. पुढच्या काळात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मुळ बुद्धीप्रामाण्यवादी भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार- प्रचार अधिक व्यापक स्वरूपात केला. आपल्या ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्ठी, हरिपाठ, अभंग, विरहीन्या इत्यादी चिंतनशील रचनांमधून व प्रत्यक्ष आचरणातून त्यांना लोकांच्या मनात विवेकाची ज्योत जागृत केली. पसायदानाच्या रूपाने दया, क्षमा, करुणा, प्रेम आणि समतेचा संदेश त्यांनी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवला. भारतीय परंपरेतील विविध विचारधारा, जाती, वर्ण, पंथ आणि सांप्रदाय एकत्रित आणून ‘हे विश्वची माझे घर’ हा नवा वैश्विक विचार जगापुढे मांडला. धर्माच्या आणि प्रातांच्याही सिमा या विचारांनी मोडून काढल्या. श्री ज्ञानदेवांचा हा वैश्विक विचार ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मुळ भारतीय वेदपरंपरेशी जोडणारा विचार होता. भारताची मुळ वैदिक धर्मपरंपरा पुन्हा तेजोमय करण्याचा हा प्रयत्न होता. जनसामान्यांच्या मनात हा विचार रुजवण्यासाठी भक्तांची मांदियाळी सोबत घेऊन अवघा मुलूख श्री ज्ञानदेवांनी पालथा घातला. आपल्या सवंगड्यांसह पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेले श्री ज्ञानेश्वर लोकांनी पाहिले, तेव्हा गावोगावचे लोक या दिंडीत सहभागी होऊ लागले. मंदिराच्या बंदिस्त गाभार्यात नव्हे, तर शेताच्या बांधावर बसून द्वैत, अद्वैत सिद्धांत आणि कुट तत्त्वज्ञान सर्वांना समजेल, अशा सोप्या मराठी भाषेत सहजपणे समजावून सांगणारा हा गोजिरवाणा बाळ अवघ्या मराठी मुलखाला आपलासा वाटला आणि मग श्री ज्ञानोबांच्या दिंडीत अवघा समाज लोटला. यातूनच वारकरी संप्रदायाचा उदय झाला.
पुढे नामदेवांपासून ते तुकारामांपर्यंत अनेक संतांनी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान रुजवण्यासाठी मोठे योगदान दिल्याचे निदर्शनास येते. वारकरी संप्रदायाची लिखित स्वरूपात कोणतीही संहिता नाही. संतांची अभंग रचना आणि संतांचे जीवन- चरित्र हीच या संप्रदायाची संहिता आहे. संतांचे अभंग प्रमाण मानून अखंड परिवर्तनाचा ध्यास घेतलेला हा वैष्णावांचा मेळा गेली सातशे वर्षे अव्याहतपणे लोकांच्या मनात प्रेमाची आणि उच्च मानवीय संस्काराची पेरणी करीत आहे. संतांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाचे वर्णन करताना संत कान्होपात्रा म्हणते,
माझ्या जीविचे जीवन। तो हा विठ्ठल निधान।
उभा असे विटेवरी। वाटे प्रेमाची शिदोरी॥
‘श्री विठ्ठल भक्तिचा प्रसाद म्हणजे प्रेम आणि प्रेम हिच श्री विठ्ठल भक्तिची शिदोरी’, असा श्री विठ्ठलाच्या रूपाचा नवा अविष्कार सांगणारे वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान लोकांना अचंबित करणारे होते. चराचर विश्वावर प्रेम करण्याची शिकवण देणार्या या संप्रदायाचे श्री ज्ञानेश्वर हे पाया आणि श्री तुकाराम कळस आहेत. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की श्री ज्ञानेश्वरांच्या पूर्वीही पंढरपुरची वारी होती. परंतू श्री ज्ञानदेवांनी आपल्या सवंगड्यांसह काढलेली पायी दिंडी ही परिवर्तनाची नवी वाट होती. ज्या काळात श्री ज्ञानेश्वरांनी हे विचार रुजवले ते पाहता फार अलौकीक असे हे कार्य होते. श्री तुकाराम महाराज या महान क्रांतीचे वर्णन करताना म्हणतात,
वर्णाभिमान विसरली याती। एकएकां लोटांगणी जाती रे।
निर्मळ चित्ते झाली नवनीते। पाषाणा पाझर सुटती रे॥
होतो जयजयकार गर्जत अंबर। मातले वैष्णव वीर रे।
तुका म्हणे सोपी केली पायवाट। उतरावया भवसागर रे॥
सध्याचा पायीवारी पालखी सोहळा हे त्या दिंडीचे प्रतिकात्मक स्वरूप आहे. म्हणूनच या पालखी सोहळ्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. मुळातच बदलाची आस घेऊन सुरू झालेल्या या वारीला बदल नवे नाहीत, हे येथे आवर्जुन सांगितले पाहिजे.
यावर्षीचे वारीचे स्वरूप बदलले असले, तरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातला वारकरी व वैष्णव भक्त आपल्या अंतकरणातील मानसपुजेच्या सहाय्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनाचा आणि पदस्पर्शाचा आनंद तेवढ्याच भक्तिभावाने घरात बसूनही घेईल, याची खात्री आहे.
कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या विशिष्ठ परिस्थितीत बदलावे लागलेले वारीचे स्वरूप अवघ्या महाराष्ट्राने मान्य केले. वारकरी संप्रदायाच्या विचारधारेचाच तो एक भाग आहे. परंतु वारकरी संप्रदायाच्या मुळ विचारधारेपासून दूर गेलेला, बदललेला काही वारकर्यांचा प्रवाह पुन्हा मुळ विचारधारेवर येणार का? हाही प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. वारकरी संप्रदायाची लिखीत संहिता जरी नसली, तरी या संप्रदायाचे अलिखित तात्त्विक अधिष्ठान आणि संतांनी आपल्या चरित्रातून घालून दिलेले आदर्श ही मोठी शिदोरी या संप्रदायाला लाभली आहे. या चाकोरीबाहेर जाऊनही स्वत:ला वारकरी म्हणवून घेणारे काही कमी नाहीत. अशा लोकांच्या रूपाने अनेक चुकीचे विचार वारकरी संप्रदायात घुसू पाहात आहेत. संतांच्या परिवर्तनावादी, विवेकी विचारांशी ही प्रतारणा असून, भागवत धर्मपरंपरेचा अपमान आहे. ज्या पाखंड खंडणाची मांडणी संतांनी किर्तनाच्या व्यासपीठावरून केली. तेथेच आता पाखंडीवृत्तीला आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा विचार किर्तनाच्या आडून मांडला जात आहे. आमच्या विनाशाला कारणीभूत ठरलेल्या अनिष्ठ प्रथा, परंपरा, रुढी संतांनी शेतातले तण उपटून टाकावेत तशा उपटून टाकल्या होत्या. अलिकडच्या काळात काही किर्तनकार- प्रवचनकार वारकरी सांप्रदायाचा आधार घेऊन त्या प्रथा, परंपरा पुन्हा रुजवू पहात आहेत. श्री विठ्ठलावर आणि संतांवर नितांत श्रद्धा असलेला वारकरी व महाराष्ट्रातील सामान्य जनता अत्यंत निष्ठेने किर्तन- प्रवचन कार्यक्रमांना उपस्थित राहते. याचा गैरफायदा घेऊन त्याच्या डोक्यात पुन्हा विषमतेचे विचार भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. धर्माच्या, जातीच्या, वर्णाच्या (स्त्री-पुरुष) भिंती मोडून काढणारा वारकरी संप्रदाय पुन्हा त्याच मार्गावर जातोय की काय अशी भीती वाटू लागली आहे. अगदी गावापासून जागतिकस्तरापर्यंत गडद होत चाललेल्या द्वेषाच्या वातावरणावर वारकरी सांप्रदाय हाच एक आशेचा किरण दिसत होता. परंतु तेथेही हा वारा पिंगा घालू लागला आहे. दुसर्या बाजूला वारकरी संप्रदायाला येत असलेले उत्सवी स्वरूपही चिंतेची बाब झाली आहे. अफाट खर्चाचे भव्य- दिव्य मंडप, अलिशान व्यवस्था आणि संपत्तीचे प्रदर्शन हे दृष्य खर्या वारकरी संप्रदायाला शोभणारे नाही. कार्यक्रम भव्य- दिव्य जरूर व्हावेत, पण त्याचे स्वरूप उत्सवी नव्हे, तर चिंतनीय असले पाहिजे. अलिकडे चिंतन आणि साधना हे विषय तर दुर्मीळ होत चालले आहेत. काहीजणांनी आता किर्तन- प्रवचन हाच आपला पोटापाण्याचा व्यवसाय निवडला आहे. किर्तन- प्रवचनासाठी कामचलावू अध्ययन करायचे आणि वारकरी तत्त्वज्ञान सांगत गावोगावी फिरायचे हा नवा प्रकार सध्या पुढे आला आहे. यासाठी आता ठिकठिकाणी वारकरी शिक्षण संस्था स्थापन होऊन लागल्या आहेत. अशा शिक्षण संस्था व्हायलाही कोणाची हरकत नाही. परंतु तेथे आत्मोद्धाराचे शिक्षण आणि ज्ञानाची वृद्धी अपेक्षित आहे. त्याचे व्यावसायिकरण होऊ नये, अथवा केवळ उपजीविकेचे साधन म्हणून त्याकडे कोणी पाहू नये, असे प्रामाणिकपणे वाटते. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेतल्या कर्मसिद्धांताला शिर्षस्थानी मानणारा वारकरी संप्रदायाचा विचार मागे पडू नये, ही यामागची भावना आहे. ‘कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी’ हा संत सावता महाराजांचा अभंग फक्त लोकांना सांगण्यासाठी नाही, तर ते वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. आपल्या वाट्याला आलेले कर्म अत्यंत निष्ठेने करत करत ईश्वर चिंतन करावे हा संदेश देणारे हे तत्त्वज्ञान आहे. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी’ हे सांगणार्या श्री तुकारामांनी जीवन जगण्याचा मार्ग सोपा करून सांगितला असताना ‘ईश्वर भक्तिलाच आपल्या जगण्याचे साधन बनविणार्याला वारकरी कसे म्हणावे? संप्रदायाला लाभलेल्या महान वैचारिक सिद्धांताचे सखोल चिंतन व सोप्या भाषेत निरूपण करण्याऐवजी ओंगळ अंगविक्षेप करून टाळ्या मिळवणारे किर्तनकार आणि भरमसाठ बिदागी मागणारे बाजारू किर्तन- प्रवचनकार यांच्यामुळे वारकरी संप्रदायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. किर्तनकारांनी बिदागी घेतली पाहिजे. त्याला कोणाचाही विरोध असणार नाही, परंतु वास्तवाचे भान ठेवून योग्य मर्यादेत हे देणे- घेणे असावे. महत्त्वाचे म्हणजे भ्रष्ट, अनैतिक मार्गाने संपत्ती मिळवलेल्यांच्या वाढदिवस सोहळ्यात होणारे किर्तनाचे भव्य कार्यक्रम हे या संप्रदायाच्या तत्त्वात बसते का? आणि अशा कार्यक्रमात उत्सवमुर्तींचे वर्णन करताना आमचे किर्तनकार त्याला थोर समाजसुधारकाची उपमा देवून मोकळे होतात. मग ती व्यक्ती दारूविक्रीचा धंदा करणारी का असेना! ही भाषा केवळ भरमसाठ बिदागी मिळते म्हणून? यातून समाजाने नेमका कोणता आदर्श घ्यायचा? पारायणाचा मंडप म्हणजे संस्काराचे विद्यापीठ असा नावलौकीक असलेल्या गावोगावच्या पारायणातून खरंच आता संस्कारांचे ज्ञान मिळते का? वक्त्यांचे बोलणे आणि त्याचे प्रत्यक्ष वागणे यातील तफावतीमुळे पारायण मंडपाचा प्रभाव कमी होत आहे का? असे असंख्य प्रश्न मनाला सतावत आहेत. हे आत्मचिंतन आहे, कोणा एका व्यक्तिवरचा रोष नाही. प्रवृत्तीचे वस्तुनिष्ठ वर्णन आहे. वारीचे स्वरूप बदलले म्हणून महाराष्ट्रभर मोठी चर्चा झाली. पण वारकरी संप्रदायातील चालकांचेच बदलत असलेले हे रूप, विचार आणि त्यांचे वर्तन याची चर्चा कोण करणार? वारकरी संप्रदायातील थोरा- मोठ्यांनी याचा जरूर विचार करावा, असे मला वाटते.
वारकरी संप्रदायाचे परिवर्तनीय विचार हा या संप्रदायाचा मुलाधार असला, तरी संतांची शिकवण आणि त्यांचे जीवन चरित्र ही या संप्रदायाची भक्कम आचार संहिता आहे. चारित्र्य संपन्न जीवन जगण्याचा आग्रह हे या संप्रदायाचे बंधन आहे. म्हणूनच हा संप्रदाय गेल्या सातशे वर्षांपेक्षा जास्तकाळ जनसामान्यांच्या हृदयात ठाण मांडून बसला आहे. संत हे त्याचे श्रद्धास्थान आहे, तर श्री विठ्ठलाची अनन्यभावाने भक्ती करणे ही त्याची निष्ठा आहे. वर्षभर आपल्या शेतात, व्यवसायात, रोजगारात राबणारा हा कष्टकरी आपल्या अंर्तमनाच्या शांतीसाठी संत वचनांचे मनन, चिंतन, गायन करण्यात मग्न असतो. आपल्या दु:खी- कष्टी जीवनातला आनंद तो या भजनात शोधत असतो. आपल्या प्रिय सावळ्या श्री विठ्ठलाचे दर्शनही तो प्रतिदिन यातच घेत असतो. अत्यंत भावविवश नजरेने तो ईश्वराला तेथेच शोधत असतो. श्री ज्ञानेश्वर महाराज त्याच्या या व्याकूळ मनाचे वर्णन करताना लिहितात,
सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सावळी विराजे कृष्ण मुर्ती।
मन गेले ध्यानी कृष्णची नयनी। नित्यता पर्वणी कृष्ण सुखे॥
हृदय परिवरी कृष्ण मनोमंदिरी। आमचा माजघरी कृष्ण बिंबे।
निवृत्ती निघोट ज्ञानदेवा वाट। नित्यता वैकुंठ कृष्ण सुखे॥
असा हा वारकरी संप्रदाय परमेश्वराचे अस्तित्व आपल्या घरात, माजघरात आणि शेवटी मनाच्या गाभार्यात शोधत असतानाच विश्वव्यापक चराचर सृष्टीच्या सुखी मंगलमय जीवनाचे अगाध तत्त्वज्ञान सहजपणाने सांगून जातो. हीच या संप्रदायाची शक्ती आहे. या शक्तीचे म्हणजेच सात्विक परंपरेचे जतन करीत भविष्यात येणार्या प्रत्येक बदलाला समर्थपणे सामोरे जाण्याचा निर्धार करणे हेच यावर्षी घरात बसून केलेल्या वारीचे चिंतन आहे.
राजेंद्र आनंदराव शेलार, प्रमुख विश्वस्त, ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे अध्यात्मिक केंद्र, आळंदी.
फोन : 8999247187