दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण शहरात युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी प्रभाग निहाय प्रचार दौऱ्याचे नियोजन केले आहे. त्या त्या प्रभागातील राजे गटाचे आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते प्रभागातील प्रत्येक कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करीत आहेत.
चर्चे दरम्यान प्रत्येकाचे म्हणणे, त्यांच्या अपेक्षा, उमेदवार यांच्या विषयी त्यांची मते आणि प्रामुख्याने नगर परिषदेचा कारभार याविषयी लोकांची मते जाणून घेतल्यानंतर अत्यंत शांतपणे पण त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता, नगर परिषद कारभार याबाबत समोरच्या व्यक्तीचे समाधान होईपर्यंत त्यांच्याशी चर्चा केल्याने शहरवासीय मंडळी समाधानी होत असून बाबा, पुन्हा या असे निमंत्रण देतानाच आता तुतारीलाच मतदान करणार असल्याचे आश्वासन युवराज श्रीमंत अनिकेतराजे यांना हसतमुखाने देत आहेत.
सुमारे २ वर्षांहुन अधिक काळ नगर परिषदेत प्रशासक असल्याने लोकप्रतिनिधी ज्या प्रमाणे नागरिकांच्या व्यक्तिगत व सार्वजनिक प्रश्नांची नोंद घेऊन लगेच संबंधीत यंत्रणेशी संपर्क करुन त्या प्रश्नांची सोडवणूक करुन नागरिकांना दिलासा देवू शकतात ती प्रक्रिया सध्या खंडित झाल्याने काही प्रश्न विलंबाने मार्गी लागत आहेत, तथापि आता विधानसभा निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणूका होतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार गतिमान होईल असा विश्वास यावेळी युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान शहर वासीयानी आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक प्रश्नांसाठी आपल्याशी संपर्क साधावा, आपल्या समस्या आपल्याकडे पाठवाव्यात त्याबाबत आपण निश्चित मार्ग काढू याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचला असून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना सर्वच राजकीय पक्ष पदाधिकारी आणि अपक्ष उमेदवार व त्यांचे सहकारी आपण केलेली कामे, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करताना केलेले प्रयत्न, आगामी काळात करणार असलेल्या कामांची माहिती मतदारांसमोर ठेवून आपल्या उमेदवाराला मतदान करण्याची विनंती करताना दिसत आहेत.
पदयात्रेत सहभागी युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर आणि अन्य पदाधिकारी प्रचार पत्रकाचे प्रकाशन करताना.